मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

जाता जाता …


आज  ३१ डिसेंबर ! म्हणता म्हणता अजून काही क्षणांत २०१३ ला निरोप द्यायची अन २०१४ चे स्वागत करायची वेळ येउन ठेपेल .

बराच काही घडलाय गेल्या १२ महिन्यांत . खरतर घडून गेलंय ! अपरिवर्तनीय बदल झालेत . खूप काही शिकायला मिळालंय . समृद्ध होतानाचाअनुभव अविस्मरणीय असाच होता . हे पहिलंच असं इंग्रजी वर्ष ज्यात मी शिक्षणासाठी घरापासून दूर राहिले . त्यामुळेच का होईना पण जे आणि जितका ह्या ५२ आठवड्यांमध्ये घडलाय तितकं यापूर्वीच्या कोणत्याच वर्षात माझ्या आयुष्यात घडलं नव्हतं .

दोन महत्वाची सत्र संपली , एक मस्त प्रोजेक्ट केला काही camp attend केले . अनेक नोबेल पारितोषिक विजेत्यांची आणि तशाच काही वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत शास्त्रज्ञांची व्याख्याने ऐकली . अशाच अनेक प्राध्यापकांकडून शिकायला मिळालं . अनेकांशी संवाद साधता आला . हे सारं IISc मध्ये असल्यामुळे झालं खरं पण खूप काही शिकवून गेलं .

ह्या शैक्षणिक गोष्टी अश्याच घडत राहतात पण त्याशिवाय जे काही मी एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडण्याच्या दृष्टीने ( असा खरच काही असतं कि नाही आणि मी तशी होऊ शकेन कि नाही हे अलाहिदा :P )   शिकले . पण हे सगळं घडलंय ते " pravega " मुळे ! विविध प्रकारच्या वल्लींशी बोलायचे , त्यांच्यासोबत काम करायचं अनेकविध गोष्टींचं भान बाळगून त्या सत्यात उतरवताना येणाऱ्या अडचणींना सामोरं जायचं ह्याचं ट्रेनिंगच मला पूर्ण वर्षभर मिळालंय .
काही वेळा वरिष्ठांचा ओरडा खावा लागला क्वचित कौतुकाची थापही !  पडेल ते काम करावं अन तेही निरपेक्षपणे हेदेखील ह्याच वर्षात मनावर ठासून कोरलं गेलंय . अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्यात . त्याची खरी कसोटी येत्या वर्षातच आहे पण तरीही येणाऱ्या काळाची एक छोटी झलकही यानिमित्ताने पाहायला मिळाली आहे .अनेक बाबतीतले निर्णय अगदी अवघड वळणावर मलाच घ्यावे लागले  अशाच प्रसंगानी परिणामांना न घाबरण्याचा निर्भयपणा शिकवला . आता वळून बघताना कळतंय काही अत्यंत चुकीचे होते तर काही योग्य निर्णय आयुष्यभर लक्षात राहतील असे होते . "मैत्री"चे अनेक अनुभव आले पण तो शब्द कधीच उमगला नाही . काही नाती अगदी दृढ झाली तर काही दुरावली . मनुष्यस्वभावाचा लहरीपणा अनुभवला . त्याचवेळी अनेकांचं प्रेमही मिळालं .

कौटुंबिक दृष्ट्या हे वर्ष तसं आजारपणांच अन दु:खाचं ठरलं . वर्ष सरताना अनेक जवळच्या अन लाडक्या व्यक्तींचा कायमचा निरोप घ्यावा लागला.अशा अनेक घटना घडल्या ज्याची कल्पनाही वर्षाच्या सुरुवातीला केली नव्हती . त्यामुळेच २०१३ ला निरोप देताना काहीशी दु:खाची किनार आहे पण त्यामुळेच ते अविस्मरणीय देखील झालं आहे . दुख: म्हणजे काय हे खरंतर  तेव्हाच मला नेमकं समजलं . ते पेलण्याची ताकद देईल अश्या अओएक्शेने मी नव्या वर्षाकडे पहात आहे .

अश्या ह्या २०१३ ला निरोप देताना अन २०१४ च्या पूर्वसंध्येला सारे जग आपल्याच आनंदात मग्न असेल . अनेकांचे महिनोंमहिन्याचे ठरलेले plans प्रत्यक्षात आणणं सुरु असेल  अश्या वेळी मला मात्र आपल्या खोलीत एकटच निवांतपणे बसून होऊन गेल्याचा आढावा घेणं मनाला समाधान देणारं ठरलंय .

नववर्षाचे स्वागत करताना झालं गेला विसरून जुन्या चुकांना मागे सारून पुन्हा नव्याने एक नवीन आयुष्य जगायचं आहे खूप काही शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे . संकल्प तर प्रतिवर्षीच केले जातात अन लगेचच मोडलेही जातात त्यामुळेच एखादा विशेष संकल्प न करता रोज काहीतरी नवीन करणं , नवीन शिकणं अन जुने संकल्प कसोशीने पूर्णत्वास नेणं एवढीच माझी स्वत:कडून माफक अपेक्षा आहे .

२०१३ ला निरोप देताना नव्या उत्साहाने अन आनंदाने २०१४ चे स्वागत करायला मी सज्ज आहे .
हे नवे वर्ष मला असेच काहीतरी शिकवणारे अन अनुभव समृद्ध करणारे असावे एवढीच इच्छा !

 - संपदा
  ३१/१२/२०१३




३ टिप्पण्या: