गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

दीपावली : एक मुक्त चिंतन

शुभ दीपावली आणि नववर्षाच्या शुभेच्छा !

असाच थोडा विचार करत बसले होते अन् विचारांची मुक्त उधळण सुरु झाली मनात . थोडीशी विस्कळीत थोडीशी आठवणीनी ओथंबलेली . आणि मग उतरवली अनुदिनीवरल्या ह्या कागदावर … 

दिवाळी दिवाळी म्हणजे नेमकं काय ?

सध्यापुरता विचार केला तर गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून माझ्यासाठी हा एक सुटी असलेला दिवस ह्याशिवाय तरी काही वेगळे महत्व नाही या दिवसाचं !

आजोबा असताना मी शाळेत असल्यामुळे मोठी सुटी मिळे आणि पूर्ण दोन आठवडे ठाण्याला जाऊन राहता येई .आजी आणि दोन्ही दादांबरोबर रांगोळी काढणे,  किल्ले बघायला जाणे अन भर दुपारी उन्हात मनसोक्त खेळणे असे ते सुंदर दिवस होते . याहीपेक्षा आजोबांसोबत दिवाळीच्या सुटीतला अभ्यास करायला मिळायचा. खूप मजा यायची या सुटीच्या दिवसांत . कितीतरी नवीन पद्धती , गणितातील गमती - जमती , लिखाणाचा सराव , मुद्रितशोधानात त्यांना केलेली मदत अन् दिवाळीच्या वहीसाठी लढवलेली कल्पकता हीच खरी  दिवाळी असायची माझ्यासाठी.केवढा शिकायला मिळलय तेव्हा आजोबांकडून ! दिवाळीची वही सजवताना , अगदी एक साधा कागद वहीत कमीत कमी गोंद वापरून कसा नीट चिकटवायचा इथपासून ते अगदी डोळ्यासमोर उभे राहील असे प्रवासवर्णन सोप्या शब्दात कसे लिहायचे किवा पत्र कसे लिहायचे हे सारे नकळत शिकायला मिळाले आजोबांकडून ह्या जेमतेम ५-६ दिवाळीच्या सुट्यांमध्ये . अशाच बहुदा त्यांच्या शेवटच्या दिवाळीत आयडियलकडे मागवून घेतलेली अन मला काही पूर्वकल्पना न देता माधुरी पुरंदरे ह्यांची "वाचू आनंदे " हे पुस्तकांची मालिका  वाढदिवस आणि दिवाळी भेट म्हणून त्यांनी घेतली होती . ती आजवरची मला मिळालेली सगळ्यात मौल्यवान अन खूप काही शिकवुन गेलेली अशी विशेष दिवाळी भेट ठरली. 
नावापुरते आणि आमची हौस भागवायला २-४ अनार ,  एखादे भुईचक्र आणि फुलबाज्यांचा एक खोका हे आणि एव्हढेच फटाके घाबरत घाबरत आई - बाबा , आजी - आजोबा,  मावशी - काका आणि दोन्ही दादांसोबत अंगणात फोडायचो . कसं कोण जाणे पण फटक्यांमुळे प्रदूषण होते इ  गोष्टी मला त्या लहान वयातही समजत होत्या . केपा आणि त्यांच्या बंदुका घेऊन मात्र आम्ही बरेच दिवस वेगवेगळे चोर शिपाई आणि इतर मारामारीचे खेळ वाडाभर उंडारत खेळत असू . आजोबा गेले अन् त्यावर्षी फटाके आणण्याचे थांबवले ते थांबवलेच . नंतरही कधीतरी आईने एकदोन फुलबाज्या आणल्या होत्या ; पण ती मजा नसल्यामुळे इच्छाच झाली नाही फटके फोडायची . पणत्या आणून त्या रंगवणे हाही एक उपक्रम मात्र नंतर बरेच वर्ष मी केल्याचं मला चांगलंच आठवतंय . 

आजोबा गेल्यावरही आजीसोबत ह्यातल्या बऱ्याच गोष्टी दर दिवाळीच्या सुटीत होत असत पण ती मजा पुन्हा कधीच आली नाही . नंतर नंतर अभ्यास वाढत गेला अन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यात ही सुटी संपू लागली पण त्यात एक वेगळी मजा  होती ज्ञान मिळवण्याची अन यश संपादन करण्याची .
पण ह्या साऱ्यात एक अत्यंत समान धागा होता ज्यात माझा बराचसा वेळ व्यतीत होई  तो म्हणजे "दिवाळी अंक " किमान दहा अंकांचे वाचन झाल्याशिवाय समाधानच होत नसे. मग ते अगदी चंपक किशोर पासून ते मोठ्यांच्या मासिकातील त्या वयात वाचण्याजोग्या कथा अन मुलाखती असोत . पुढे पुढे गाडी चांदोबा वगैरेंवरून एकदम पत्रिका , छात्र प्रबोधन यांवर येउन थांबली. पण ह्या अंकांनी जणू व्यक्तिमत्व घडणीत फार मोठा मोलाचा वाटा  उचलला . समाज म्हणजे काय ह्याचे भान हळूहळू ह्यातून येत गेले. माणसांच्या चित्रविचित्र स्वभावाचे निदान theoretically ज्ञान होत गेले .दिवाळी अंकांची चाहूल मला पार कोजागिरी पासून लागत असे. कोणताही अंक माझ्याशिवाय कोणी उघडायचा नाही ह्या एका कारणावरूनच काय तो हट्ट - चिडचिड आणि रडणं होत असे. दिवाळी म्हणजे दिवाळी अंक हे जवळ जवळ bijective Function जणू ! 

हळू हळू मोठी होत गेले तसा आता वर्षभर खात असलेल्या चिवडा - लाडू चकलीचे दिवाळीपुरते पूर्वी असलेले महत्व कमी झाल्याने, घरातल्या अनेक मधुमेहींमुळे एकूणच गोड मिठाई आणि इतर पदार्थ खाण्यातला कमी झालेला उत्साह , वर्षानुवर्षे पाहिलेली दादरची खरेदीची गर्दी आणि आधीच गरज भागेल इतके असलेले कपडे ह्यांमुळे नवीन कपडे वगरे बद्दल असलेली अनास्था , कुटुंबीयांनी एकत्रित भेटण्यासाठी नसलेला वेळ आणि मुंबईत होणाऱ्या प्रचंड प्रदूषणामुळे होणारी चिडचिड … एकूणच ह्या अनेक घटकांमुळेच दीपावली साजरी करण्यात फोलपणा आहे असेच काहीसे वाटू लागले . घरी तसेही कोणत्याच सणाचे प्रस्थ - पूजा - अर्चांचे अवडंबर नव्हतेच . कदाचित त्यामुळेच मी मनातून ह्या  दिखाऊ साजऱ्या उत्सवापासून कायमच दूर दूर जात राहिले .

गेली तीन वर्षे मात्र इथे वेगळ्याच विश्वात असल्याने दिवाळीचातसा विशेष गंधही नाहीये. नवीन कपडे घालणे अन केवळ आपली संस्कृती , पूजा - अर्चा … अशा दृष्टीकोनातून मी कोणत्याच सणाकडे अन विशेषत: दिवाळीकडे आजतागायत पहिले नसल्यामुळेच  असेल कदाचित पण राहिलेला अभ्यास संपवण्यासाठी मिळालेली एक बोनस सुटी अशी माझी मानसिकता झालीये . फारतर आंतरजालावर प्रसिद्ध होणारऱ्या दिवाळी अंकाचे वाचन एवढाच माझा काय तो दिवाळीशी संबंध . 
आम्ही सगळीच भावंडं वेगवेगळ्या शहरांत आणि आपापल्या कामात व्यग्र आहोत . आणि . . आता आजीही नाही :( आम्हाला सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवणारा हा महत्वाचा दुवाच निखळलाय. यंदापासून तिची दरवर्षी होणारी भाऊबीजही आता ह्यापुढे नसेल . माझी दृष्ट काढायला ते सुरकुतलेले मऊ हात नसतील अन् मुख्य म्हणजे मी पुढच्या सुटीत घरी जाईपर्यंत माझ्यासाठी खुणा करून ठेवलेल्या दिवाळी अंकातले लेख नसतील . छात्र प्रबोधनच्या अंकाला कुणीच स्पर्श केलेला नसेल . आई - बाबा देखील बहुदा कार्यालयातून मिळालेली ही सुटी इतर कामे करण्यासाठीच वापरत असतील.

खरंतर सगळी मजाच जणू निघून गेलीये आता दिवाळीतली. इथे सगळ्या मैत्रिणी sweets , new dresses , पूजा , lamps अश्या चर्चा करत असताना त्यात सहभागी व्हायची अजिबात इच्छा नाहीये . त्यात एकाच समाधान म्हणजे आज एक नवीन दिवाळी अंक वाचायला मिळाला . अक्षरश : झपाट्याने वाचून काढला अन् वाटले हीच माझी यंदाची दीपावली . 


गेले ते दिन गेले म्हणत त्या जुन्या आठवणीत रमायचे अन् पुढील अभ्यासासाठी सज्ज व्हायचे यासाठी घेतलेला एक थांबाच जणू …

- Sam

ऑक्टोबर २३ , २०१४
लक्ष्मीपूजन