रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

पूर्णविराम : एका वेगळ्या प्रवासाला

१४ सप्टेंबर २०१३
अचानक संध्याकाळी एक धक्का बसला . एक जबाबदारी अंगावर पडली !  हे सगळा इतकं अनपेक्षित होतं की तेव्हा कसलाच विचार केला नव्हता . डोक्यात विचारचक्रे सुरु झाली होती पण ; पुढे काय होणार आहे हे तेव्हा कळणार तरी कसे होते ! त्या वेळी  आधीच इतक्या गोष्टीत मी गुंतलेले होते की एक चेंलेंज स्वीकारावं तसा काहीसं डोक्यात नोंदले गेले ते क्षण ! १४ सप्टेंबर २०१४
 खरंतर ज्या क्षणी मी हे उतरवत आहे त्याच सुमारास हे घडलं . आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालंय .

सुरुवातीला वाटणारी नसती कटकट नंतर खरंच आनंद देऊन गेली . कधी चेंलेंज म्हणून तर कधी मजा म्हणून जे जे जमेल ते करत गेले .
सगळ्यांपेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असूनसुद्धा माझ्यावर कोणीतरी विश्वास टाकला होता माझ्यापरीने मी तो सार्थ ठरवलाय. भल्यासाठी  जितकं जमेल तितकं केलंय . चुका माफ नक्कीच होतील

अनेकांना सोबत घेऊन काहीतरी यशस्वी करणं हे सोपं नसतं  विशेषत : मुलींना , ह्याची जाणीव ह्या प्रवासात झाली .
अनेक हात सोबतीला  पण तोंडं चार दिशांना अश्या परिस्थितीत खंबीरपणे मार्ग कसा काढायचा हेही ह्यानिमित्ताने उमगलं. प्रवाहाविरुद्ध पोहताना अनेक अडचणी असल्या तरीही त्यात एक वेगळी मजाही असते हे समजलंय .
कधी चुकले , कुठे अडखळले. कधी एकटीनेच मार्ग काढला तर कधी कोणाच्या सोबतीने . मार्गदर्शन करायला अनेकांची साथ अन् भरभक्कम पाठींबा वेळोवेळी होताच . त्याशिवाय हे निभावणं शक्यही झालं नसतं .

 एका जबाबदारीतून मुक्त झाले . दिवस - रात्र एक करून , जेवण विसरून करावे लागणारे कामही नसेल . उरल्यात त्या फक्त गेल्या वर्षभरातल्या  कडू - गोड आठवणी . निरोपाचे दु:ख निश्चितच नाही . पण जोडला  गेलेला  मित्रपरिवार  दुरावेल ह्याचे वाईट नक्कीच वाटतंय .

अशी हि अनुभवांची शिदोरी घेऊन आता पुढे वाटचाल करणार आहे .

अगदी मुक्तपणे .. . .

- संपदा