शनिवार, २४ जानेवारी, २०१५

Humanities UH 302 : शासनाची ओळख

नव्या वर्षासोबतच नवे सेमिस्टर सुरु झाले. नवे कोर्सेस , वेगळे विषय , नवे वेळापत्रक ह्या सगळ्याशी जुळवून घेतानाच  जवळ जवळ ९- १० महिने ज्याची अत्यंत आतुरतेने वाट बघितली होती तो म्हणजेच आमचा शेवटचा humanities चा कोर्स सुरु झाला . अगदी course format वाचला तेव्हाच खात्री पटली होती आणि पहिल्या लेक्चर मध्ये बऱ्याच अपेक्षांची पूर्ती होईल असे संकेत मिळाले . अगदी वेगळा अनुभव , अनेकविध विषय अन् तेही आपल्या रोजच्या वाचनातले ! त्यामुळेच वेगवेगळ्या लेक्चर्स मध्ये मिळालेली माहिती , त्यात आम्ही केलेली चर्चा  , त्याच विषयाशी संबंधीत अश्या एका वेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांच्या गटाने केलेल्या वाचन , संशोधनाचे सादरीकरण ह्याचा गोषवारा इथे मांडवा असं मला वाटतंय . जशी lectures होतील तसं त्याच लिहिण्याचा प्रयत्न करेन . बघूया कितपत जमतंय . खरतर इंग्रजीत झालेल्या चर्चा मराठीत आणि  माझ्या भाषेत मांडणं हेच बहुतेक सगळ्यात कठीण असेल . English मध्ये लिहिणं खरंच खूप सोपं गेलं  असतं पण अश्या प्रकारचे विषय एकत्रित मराठीत कुठे मांडले गेलेले माझ्या सहज वाचनात आले नाहीत म्हणूनच ही उठाठेव !

===================================================
मानवशास्त्र म्हणजेच Humanities चा कोर्स आम्हाला प्रत्येक सत्रात असतो त्यातला शेवटचा केवळ एका क्रेडिटचा सेमिनार कोर्स म्हणजेच UH 302 : Introduction to governance म्हणजेच ' शासनाची ओळख ' !
अगदी नावाप्रमाणेच ह्या कोर्सच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या शासनयंत्रणांची ओळख - माहिती आणि त्यासोबत त्या यंत्रणेशी संबधित एखाद्या संवेदनशील / महत्वपूर्ण विषयावर विद्यार्थी गटाने केलेले प्रेझेंटेशन असे एका सत्राचे स्वरूप असेल . आत्तापर्यंत २ सत्र झाली आणि मुख्य म्हणजे जेवणाची वेळ उलटून गेली तरी -  रात्रीचे साडे आठ वाजून गेले तरी आणि मुख्य म्हणजे जवळपास तीन तास चर्चा - परिसंवाद होऊनही ५० % उपस्थिती शेवटपर्यंत होती  हे नक्कीच आश्चर्यकारक ( प्राध्यापकांसाठी :P ) होतं . 




प्रध्यापाकांबद्दल थोडेसे :
Prof . Uday Balakrishnan हे १९७५ च्या batch चे भारतीय टपाल सेवेतील एक निवृत्त अधिकारी ! राज्यशास्त्रात उच्चशिक्षण घेतलेल्या उदय यांनी भारत सरकारच्या अनेकविध महत्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे आणि त्या अनुषंगाने देशाचा बराचसा ग्रामीण भागही पिंजून काढला आहे . ह्या सेवेच्याच कालावधीत शासनातर्फे त्यांची नेमणूक IISc मध्ये ५ - ७ वर्षे registrar म्हणून झाली होती . सध्या  ते एक लेखक , CCS -  IISc मध्ये मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत असून कोचीन येथील एका कला संग्रहालयाचे सल्लागार देखील आहेत .


===================================================


Lecture ०१ : १० जानेवारी २०१५

खरंतर त्या दिवशी मुख्यत्वे आमचे गट पाडणं , विषय निवडणं आणि लेक्चरच्या वेळा ठरवणं ह्यातच बराचसा वेळ गेला परंतु नेमकं काय काय शिकायला मिळेल ह्याची थोडीफार चर्चाही झाली.

भारत  : एक लोकशाही संघराज्य 
वय : जेमतेम ७० वर्षे
लोकसंख्या केवळ अफाट !
अनेक तापदायक शेजारी !
मुक्त अर्थव्यवस्था : १९९१ पासून प्रयत्न


कृषिप्रधान अर्थव्यवस्था
आणि  ……
आपण अजून स्वतंत्र  आहोत  - लोकशाही कशी असावी एक उत्तम उदाहरण . आज आपल्याला ( अजूनतरी ) कोणीतरी लष्करी अधिकारी अचानक उठाव करून देश ताब्यात घेईल ह्याची तितकीशी भीती नाही खरंतर  असा विचार आपण कधीच करत नाही !
 कितीही संकटे आली तरीही एक देश म्हणून आपण एकत्र येतो . खरंतर वाकेन पण मोडू देणार नाही अश्या लवचिक मानसिकतेतून आजवर आलेल्या अनेक अंतर्गत राजकीय - सामाजिक - नैसर्गिक उठावांना आपण यशस्वीपणे तोंड दिले.
इंग्रजांनी जिथे सोडले तिथूनच आपण प्रगतीला सुरुवात केली ! आज आपण त्या प्रगतीच्या - उत्कर्ष साधण्याच्या मार्गावर असलेल्या एका वळणावर उभे आहोत . कदाचित पुढच्या विकासासाठी आपल्याला आजची परिस्थिती बदलायची नितांत गरज असेलही पण हा केवळ एक टप्पा आहे आणि १९४७ च्या मानाने आणि तत्कालीन आर्थिक परिस्थिती , लगोलग झालेली युद्धे  , आणीबाणी ह्या सर्वांना तोंड देऊन आपण एक देश म्हणून जी प्रगती साधली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे !

आगदी जुने* संदर्भ चाळले तर अनेक अमेरिकन आणि युरोपीय राजकीय अभ्यासकांनी दक्षिण आशियाला वाचवायचा असेल तेथील परिस्थिती सुधारावयाची असेल तर भारताचा बळी  लागेल अशी अभ्यासपूर्ण विधाने केली होती त्यापार्श्वभूमीवर आपण एक लोकशाही सार्वभौम संघराज्य म्हणून ( अलिप्ततावाद सांभाळून ) जे काही साधले आहे ते तितकेही वाईट नाहीच म्हणून ह्यापुढे वेगवेगळे विषय चर्चेस घेऊन त्यासंदर्भात आजवर काय झाले आणि कोणत्या सुधारणा करता येतील / पुढची विकासाची दिशा काय आहे हे समजून घेऊया .





*१९५० पूर्वी आणि त्यासुमारास काहीवेळा १९६५ नंतरही