शनिवार, ७ जून, २०१४

आठवणीच्या चिंध्या


काल दुकानात प्रिंटआउट काढण्यासाठी गेले होते . तेव्हा माझ्या  job च्या कागदांच्या ह्या चिंध्या दिसल्या अन् जूने दिवस आठवले ! तिथल्या मुलाने हा सारा कचरा फेकून द्यायच्या आत मी जवळजवळ तिथून हिसकावून घेतला आणि माझ्या पिशवीत कोंबला . माझा सहकारी माझ्याकडे बघतच राहिला पण त्याला काहीच कळणार नव्हते माझ्या मनात त्या क्षणी काय चालू होते ते !


माझे मन जवळजवळ १५ वर्षे मागे गेले . म्हणजेच मी तेव्हा साधारण ३ - ४ वर्षांची असेन. बाबांच्या ऑफिसात जायचं ह्याचं खूपच अप्रूप असे तेव्हा . दरवर्षीचा दसरा  वगळता एखादी वारी होई माझी तेथे . पण तिथे गेल्यावर अश्याच कागदाच्या चिंध्यांचा डोंगर दिसत असे . त्यावर जाऊन उड्या मारणे , त्यातल्या वेगवेगळ्या आकाराच्या चिंध्यांचे मासे तयार करणे आणि अनेक चिंध्या सोबत घरी घेऊन येणे हे माझे आवडते उद्योग !
बाईंडर काका देखील अगदी प्रेमाने मला हे सारे करू देत . कधी कधी मग प्रिंटर काका मला एखाद्या कागदांच्या उंच गठ्ठ्यावर बसवत . मग सगळ्या प्रेस मध्ये काय चाललं आहे हे तिथून मला दिसे . त्या छपाई यंत्राचा तो एका लयीतला कागद उचलताना होणारा आवाज आणि मग हळूच सरकत जाऊन शुभ्र अंगावर रंगीत नक्षी लेवून खाली पडणारा तो कागद ! खूपच अचंबा वाटायचा मला साऱ्याचा . मशीनही अजस्त्र वाटत असे . दसऱ्याच्या दिवशी सजलेली यंत्रे अन् हत्यारे , रंगाचे डबे , cutting machine त्याच्या वेगवेगळ्या blades ह्याची सारे कामगार अगदी मनोभावे पूजा करत . त्या दिवशी साधा कागदाचा तुकडाही पवित्र वाटत असे !

पुढे जशी वर्षे गेली तसा प्रेससुद्धा घराजवळ आला अन मग मी बऱ्याचदा इंटरनेट साठी किंवा सहजच तिथे जात असे. आर कधी यंत्र चालू नसेल तर ती शांतताही त्रासदायक वाटत असे इतका त्या यंत्राचा आवाज परिचित आणि आपलासा वाटत असे मला !

हळूहळू बाबांचे बोलणे ऐकून मीदेखील हे यंत्र कसा चालतं हे समजू लागले होते . ढगाळ वातावरणात कागदावर चुण पडू नये म्हणून छपाई करत नाहीत , दोर्याने शिवलेली पुस्तके गमिंग केलेल्या पुस्तकांपेक्षा अधिक काळ टिकतात , कागद हळुवार उचलावा अन्यथा त्याच्या कडांनी हाताला चिरा जातात , कागद कापताना खाली पुठ्ठा ठेवावा असे अर्धवट ज्ञान मलाही झाले ! गमिंग आणि पेस्टिंग कसा करतात , एखाद्या वस्तूला / वही - पुस्तकाला व्यवस्थित कव्हर कसे घालावे हे जणू तज्ञ व्यक्तीकडून शिकायला मिळाले . अगदी साधी छपाई करताना देखील कागद कसा वाचवावा ह्याचेही बाळकडू मला मिळाले . ह्या सगळ्या गोष्टी शिकताना एक मात्र झाले खूपच मोठ्या प्रमाणात सतत कागद बघितल्याने कदाचित मी त्याच्या काटकसरी वापराबाबत प्रचंड बेफिकीर झाले आहे .

हे सारे असले तरीही मला नेहेमी वाटत असे की ह्या सार्या informal शिक्षणाचा मला उपयोग तो काय ! पण गेल्या साधारण वर्षभरात ह्या माझ्या गृहितकाला धक्काच बसला . pravega साठीचे प्रिंटींग जास्तीत जास्त चांगले करताना , scipher साठीचे packing करताना, कागद भरभर कापताना किंवा अनेक गठ्ठे उचलून नेताना , बक्षिसे wrap करताना जेव्हा मी भरभर ही  कामे इतरांपेक्षा दुप्पट वेगाने अक्षरश: उरकते तेव्हा मला जाणवतं की केवळ आणि केवळ बाबा अन् graphitec मुळेच आणि बाबांकडून मिळालेल्या अनौपचारिक ज्ञानामुळे हे मला जमू शकतंय . ह्या साऱ्याबद्दल मी कायमच त्यांची आभारी असेन .

खरंतर छपाई केवळ माझे बाबाच नाहीत तर आई अन् आजीने देखील ( indirectly आजोबा सुद्धा ) एक उद्योग - धंदा म्हणून कोणत्या न कोणत्या प्रकारे अन् त्यांच्या जीवनात एकदातरी केली आहे . म्हणूनच मी ह्या क्षेत्राशी सध्या थेट संबंधित नसले तरीही मलाही आयुष्यात कधी न कधी छपाई संदर्भात काहीतरी करायला नक्कीच आवडेल .

कित्येक वर्षे झाली सतत धावणाऱ्या त्या यंत्राचा आवाज शेवटचा ऐकून !
रंगांच्या डब्याचा अन् केरोसिनचा तो सुवास आजही मनात दरवळतो आहे .
रोलर पुसण्यासाठी लागणाऱ्या कापडाच्या चिंध्या माझ्या खोलीत आपण कधीतरी वापरले जाऊ म्हणून आजही वाट बघत आहेत !
कागद / चित्रे कापून चिकटवताना मागे उरणाऱ्या चिंध्या कचऱ्यात जाण्याआधी टेबलावर अनेक दिवस रेंगाळणे नेहेमीचेच आहे .
काल मला मिळालेला हा चिंध्यांचा गुंता अनेक दिवस माझ्याकडेच मुक्काम करणार आहे . ह्या जुन्या रम्य विश्वाची सफर सतत घडवून आणणार आहे
परंतु
 आता  ह्या आठवणीच्या चिंध्या पुन्हा जोडून एकसंध चित्र तयार करून त्या दुनियेत प्रत्यक्षात जाता येणार नाही हे सत्य अस्वस्थ करत राहणार आहे .

 - Sam