रविवार, २३ मार्च, २०१४

संवाद साधताना . . .

लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत यावर्षी सई परांजपेंची 'सय' अशी लेखमालिका येत आहे . मला आजपर्यंतचे बरेचसे लेख आवडले . विचार करायला प्रवृत्त करणारे वाटले आजचाही लेख त्याला अपवाद नव्हताच !
आजच्या लेखात त्यांनी सामान्य फ्रेंच माणूस कसा आत्मविश्वासाने बोलतो आणि आपण आपल्याच मातृभाषेत संवाद साधताना कसे अडखळतो ह्याबद्दल  थोडे लिहिले आहे. त्यावरूनच माझे विचारचक्र सुरु झाले .

किती खरं आहे हे ! म्हणजे मला फ्रेंच नागरिकांबद्दल माहित नाही पण आपल्याबद्दल जे काही म्हटलंय ते अगदी खरय असं  वाटतं .  अगदी माझंच उदाहरण घेतलं तर कितीही शिकवलं गेलं असलं तरीही मी माझे विचार चारचौघात स्पष्टपणे न अडखळता नेहेमीच मांडू शकते असा मला वाटत नाही . अगदी वाईट परिस्थिती नसली तरीदेखील एक 'वक्ता' म्हणून मी स्वत:बाबत नाहीच . असं का व्हावं ?

'वक्ता दशसहस्त्रेषु ।' असा म्हटलं जातं ते अगदी १००% खरं आहे . सध्या निवडणुकांचा काळ आहे आणि  दूरदर्शन वाहिन्यांवर अनेक मुलाखती होत असतात . अनेक निवेदक त्यांच्या भावना अन् त्यांचे प्रश्नच थेट सहभागी वक्त्यांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत . काय हे दुर्दैव ! अजूनही आठवतंय पूर्वी सह्याद्रीच्या ९च्या बातम्या खास निवेदन कसे करावे अन् मुलाखत कशी घ्यावी हे शिकण्यासाठी मला दाखवल्या जायच्या . प्रदीप भिडे, शैलेश दातार , स्नेहा आघारकर वासंती वर्तक ह्यांच्यासारखे कसलेले निवेदक असत १० वर्षांपूर्वी ! खूप शिकायला मिळत असे त्यातून . केवळ दहा मिनिटांच्या त्या मुलाखतीत नेमके प्रश्न कसे विचारावेत अन छोटी परंतु आशयपूर्ण उत्तरे कशी द्यावीत हे साडेनऊच्या बातम्यांमधूनच शिकावं !

अडखळण्यामागाची कारणमीमांसा केली तर सुसूत्र विचार नसणं , ठाम मतांचा अभाव आणि भाषेवरचं कमी झालेलं प्रभुत्व हे प्रामुख्याने जाणवतं . सुसूत्र विचारधारेसाठी , ठाम मतांसाठी लागणारे चौफेर वाचन सध्या खूपच कमी झालंय. इंटरनेटच्या प्रभावामुळे एका ठराविक पद्धतीचे वाचन खूप जास्त होत असेलही पण त्यात म्हणावे तितके वैविध्य नाही . संदर्भ शोधण्यासाठी पुस्तके / ग्रंथ चाळणे अन् आपल्याला जे हवं आहे ते सोडून भलत्याच विषयाची माहिती आपोआप मिळणं हे गुगल सर्चमुळे बहुदा विसरलं गेलंय .अत्यंत गतिमान युगात व्याख्यानमालेला जाऊन भाषणे ऐकणं  संस्कृती हळूहळू नष्ट होत चालली आहे . मित्रमैत्रिणीबरोबर केलेल्या चर्चा - वादविवाद ह्यातूनच अनेकदा  माहिती ( data )  मिळत असे अन त्यातूनच अनेकविध निष्कर्ष ( data analysis ) काढून ठाम मते तयार होत . सध्या वेळेच्या अभावी हे सारं खूपच कमी झालंय .

भाषा अन् त्यावरचं प्रभुत्व हा एक स्वतंत्रपणे चर्चिण्याची गोष्ट ! काही दिवसांपूर्वीच एका दादाशी चर्चा करताना लक्षात आले कि गेल्या कित्येक दिवसांत शुद्ध मराठीत कोणाशीच संवाद साधला नाहीये ! नेहेमीच संवादात  इंग्रजी अथवा हिंदी शब्दांची पेरणी अभावितपणे केली जाते . मग आम्ही ठरवल्यावर थोड्या प्रयत्नांनी आम्हाला विशेष कष्ट न घेत सहज संवाद साधने जमलेदेखील . त्यातूनच लक्षात आले ,भाषेचा गोडवा जपणाऱ्या अन् काही वर्षांपूर्वी रोजच्या बोली भाषेतही वापरल्या जाणाऱ्या कित्येक शब्दांचा आम्हाला विसर पडला होता जणू ! खरंतर एखाद्या भाषेत संवाद साधताना केवळ आणि केवळ त्याच भाषेत बोलणं हेच योग्य आहे असं मला वाटतं . मग ते मराठी असो , इंग्रजी असो व इतर कोणतीही भाषा . आमच्या नाट्यशास्त्राच्या शिक्षकांनी भारतीयांच्या इंग्रजी बोलाण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकला होता . जर भाषेवर विशेष कष्ट घेतले नसतील तर आपल्या इंग्रजी संभाषणातून आपली मातृभाषा बर्याचदा डोकावते . हे केवळ मराठी मातृभाषा असलेल्यांचेच नाही तर सर्वसाधारण भारतीय प्रवृत्ती ( सवय खरंतर ) आहे !
सोपं उदाहरण म्हणजे  नकळतच म्हणतो : It is a huuuuuuuge Auditorium ! ( इट इझ अ ह्यूSSSज ऑडीटोरिअम ) आपल्या भावनाप्रधान भाषेमुळेच असं होतं . प्रत्यक्षा इंग्रजीत असा विशेषणांना विशेष महत्वाच  नाहीये !
तसंच केवळ त्याच भाषेत संवाद साधल्याने आपल्या विचारात सुसूत्रता येतेच त्याचबरोबर आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवणं खूप सोपा जातं अन आपला आत्मविश्वासही त्यातून दिसून येतो .

ह्याउलट मला बरंच काही शिकवून गेलेला अनुभव म्हणजेच आकाशवाणीवरच्या मुलाखती अन् वाचन ! आपल्या नेहेमीच्या बोलण्याला बर्याचदा सवयीमुळे एक विशेष गती आलेली असते परंतु रेडिओवर वाचन करताना आपण आपले हावभाव लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही म्हणूनच सावकाश बोलण्याला विशेष महत्व असतं . माझाच कार्यक्रम नंतर पुन्हा ऐकताना लक्षात आलं कि मी इतकं वेगात बोलले होते कि कदाचित ऐकणार्यांपर्यंत ते पोहोचलंच नसावं . तसाच नियम निबंध वाचनाला . भाषेत वैविध्य असावा म्हणून दोन साधी वाक्ये जोडताना आपण ' आणि ' 'अन्' आणि ' व ' चा तितकाच वापर करतो परंतु बोली भाषे आपण 'अन्' जास्त वापरतो आणि 'व ' वापरताच नाही !
माझं रेकॉर्डिंग होईपर्यंत अन माझ्या हे निदर्शनास आणून दिलं गेलं तोपर्यंत मी असा  विचार केलाच नव्हता !

 ह्यातूनच लक्षात आला संवादाच्या प्रत्येक माध्यमाचे . भाषेचे काही नियम हे उपयुक्तता आणि सोय ह्यातून निर्माण झालेले असतात ते पाळणं हे एक बंधन नसलं तरीही मेंदूच्या एका कोपर्यात त्याची नोंद करून घेणं अन योग्य वेळी वापर करायचा प्रयत्न करणं हे आपण नक्कीच करू शकतो .

शेवटी भाषा हे एक माध्यम आहे म्हणूनच ती कोणतीही असो श्रोत्याच्या  घेऊन न अडखळता अस्खलित संवाद साधणं हेच महत्वाचं !

- संपदा
  २३ / ०३ / २०१४ 

(  लेख लिहून झाल्यावर लक्षात आलंय की  मांडणी खूपच तुटक झालीये , नेमकेपणा तर मुळीच नाहीये आणि शुद्धलेखन दूरची गोष्ट  ; पण कदाचित लिहून लिहूनच सरावाने हे  साधता येईल हि छोटीशी  आशा त्यामागे आहेच :)  )