रविवार, २४ जुलै, २०१६

रिओ ऑलिंपिक २०१६

 The greatest show on earth असं ज्या सोहळ्याचं वर्णन केलं जातं असा क्रीडासोहळा म्हणजेच उन्हाळी ऑलिंपिक!
माझ्यासारख्या क्रीडाप्रेमींसाठी ऑलिंपिकचा काळ म्हणजे पर्वणीच. दर चार वर्षांनी जुलै महिना सुरू झाला की ऑलिंपिकचे वारे वाहू लागतात. तसंच यंदाही ५ ऑगस्टपासून ब्राझीलच्या रिओ शहरात सुरू होणाऱ्या ह्या क्रीडासोहळ्याची प्रचंड उत्सुकता आहे. आजपासून केवळ ३३ दिवस उरले आहेत.
मी खऱ्या अर्थाने ऑलिंपिक फॉलो करायला लागले २००४ मध्ये. चौथीत होते तेव्हा. वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करून जेमतेम दीड- दोन वर्ष झाली होती. मी पहिल्यापानावरुन थेट शेवटच्या पानावर जायचे आणि उलटं वाचत यायचे त्यामुळे माझा पेशन्स संपायच्या आता क्रीडा पान वाचून होत असे. तेव्हा ऑलिंपिकचा इतिहास, सहभागी देश, सोहळ्याचं नियोजन, क्रीडापटूंची तयारी ह्या सगळ्याबद्दल माहिती मिळत गेली. त्यातच राज्यवर्धन राठोडने जिंकलेलं रौप्य पदक ह्या सगळ्यामुळे मी भारावून गेले होते.
२००८ बीजिंग ऑलिंपिकच्यावेळी वेळेचा फरक जास्त नव्हता आणि घरातला TV पुन्हा सुरू झाला होता त्यामुळे रोज दुपारी शाळेतून परत आल्यावर DD sports पुढे ठाण मांडून बसत असे. अक्षरश: भारावलेले दिवस होते. एखादा TT/टेनिसचा सामना बघताना गृहपाठ उरकणं आणि रात्री सगळ्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांची पारायणं करणं. अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळाल्यानंतरची राष्ट्रगीताची चित्रफीत पाहताना डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते. फेल्प्सची सुवर्णपदकं, बोल्टचा वेग, poll vaulter येलेनाचं सुवर्णपदक, लिन डॅनचं पहिलं सुवर्णपदक हे आणि असे अनेक क्षण मनात कोरले गेले आहे.
२०१२ लंडन ऑलिंपिक सुरू झालं त्याच सुमारास मी बंगलोरला शिफ्ट झाले त्यामुळे इंटरनेट मिळेपर्यंत ऑलिंपिक सोहळा संपला होता आणि ह्याची आजही खंत आहे पण म्हणूनच अपडेट्ससाठी सतत बाबांना फोन करून फोनवरून फॉलो केलेलं हे ऑलिंपिक लक्षात राहिलं. नंतर मात्र ह्या सोहळ्यातले अनेक क्षण कित्येकदा यूट्यूबवर पुन्हा पुन्हा पाहिले आहेत/आजही पाहते.
२०१६चा महासोहळा सुरू व्हायला जेमतेम दोन आठवडे बाकी आहेत. समजायला लागल्यापासूनचं माझं चौथं ऑलिंपिक. वेळेच्या फरकामुळे लाईव्ह पाहायचं तर रात्रीचा दिवस करावा लागेल. शक्य झालं तर ते करेनच. तुमच्यापैकी बऱ्याचजणांनी आधीचे कित्येक ऑलिंपिक सोहळे दूरदर्शनवरून/प्रत्यक्षात पाहिले असतील.
खेळाचे नियम माहिती नसतानाही खेळाडूंची तयारी, संघभावना, अनेक वर्षांची मेहेनत, खिलाडूवृत्ती, कट्टर वैरी देशातल्या खेळाडूंनी एकमेकांशी साधलेला संवाद पाहताना वेगळंच आंतरिक समाधान मिळतं. खेळातला थरार, क्रीडापटूंवरचा, प्रशिक्षकांवरचा ताण, अपेक्षापूर्तीचं समाधान, जिंकल्यानंतरचा आनंद, अनपेक्षित यशापयश हे सगळं आपणही दूरदर्शनच्या माध्यमातून अनुभवत असतो.
ऑलिंपिकच्या उद्देशानुसार सारं जग एकवटतं. राजकीय-सामाजिक विषमता, हेवेदावे विसरून केवळ खेळासाठी एकत्र आलेल्या क्रीडापटूंना आणि प्रेक्षकांना १५ दिवस इतर साऱ्या कामांचा विसर पडतो ह्यातच ह्या चळवळीचं यश आहे.