मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

जाता जाता …


आज  ३१ डिसेंबर ! म्हणता म्हणता अजून काही क्षणांत २०१३ ला निरोप द्यायची अन २०१४ चे स्वागत करायची वेळ येउन ठेपेल .

बराच काही घडलाय गेल्या १२ महिन्यांत . खरतर घडून गेलंय ! अपरिवर्तनीय बदल झालेत . खूप काही शिकायला मिळालंय . समृद्ध होतानाचाअनुभव अविस्मरणीय असाच होता . हे पहिलंच असं इंग्रजी वर्ष ज्यात मी शिक्षणासाठी घरापासून दूर राहिले . त्यामुळेच का होईना पण जे आणि जितका ह्या ५२ आठवड्यांमध्ये घडलाय तितकं यापूर्वीच्या कोणत्याच वर्षात माझ्या आयुष्यात घडलं नव्हतं .

दोन महत्वाची सत्र संपली , एक मस्त प्रोजेक्ट केला काही camp attend केले . अनेक नोबेल पारितोषिक विजेत्यांची आणि तशाच काही वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत शास्त्रज्ञांची व्याख्याने ऐकली . अशाच अनेक प्राध्यापकांकडून शिकायला मिळालं . अनेकांशी संवाद साधता आला . हे सारं IISc मध्ये असल्यामुळे झालं खरं पण खूप काही शिकवून गेलं .

ह्या शैक्षणिक गोष्टी अश्याच घडत राहतात पण त्याशिवाय जे काही मी एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडण्याच्या दृष्टीने ( असा खरच काही असतं कि नाही आणि मी तशी होऊ शकेन कि नाही हे अलाहिदा :P )   शिकले . पण हे सगळं घडलंय ते " pravega " मुळे ! विविध प्रकारच्या वल्लींशी बोलायचे , त्यांच्यासोबत काम करायचं अनेकविध गोष्टींचं भान बाळगून त्या सत्यात उतरवताना येणाऱ्या अडचणींना सामोरं जायचं ह्याचं ट्रेनिंगच मला पूर्ण वर्षभर मिळालंय .
काही वेळा वरिष्ठांचा ओरडा खावा लागला क्वचित कौतुकाची थापही !  पडेल ते काम करावं अन तेही निरपेक्षपणे हेदेखील ह्याच वर्षात मनावर ठासून कोरलं गेलंय . अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्यात . त्याची खरी कसोटी येत्या वर्षातच आहे पण तरीही येणाऱ्या काळाची एक छोटी झलकही यानिमित्ताने पाहायला मिळाली आहे .अनेक बाबतीतले निर्णय अगदी अवघड वळणावर मलाच घ्यावे लागले  अशाच प्रसंगानी परिणामांना न घाबरण्याचा निर्भयपणा शिकवला . आता वळून बघताना कळतंय काही अत्यंत चुकीचे होते तर काही योग्य निर्णय आयुष्यभर लक्षात राहतील असे होते . "मैत्री"चे अनेक अनुभव आले पण तो शब्द कधीच उमगला नाही . काही नाती अगदी दृढ झाली तर काही दुरावली . मनुष्यस्वभावाचा लहरीपणा अनुभवला . त्याचवेळी अनेकांचं प्रेमही मिळालं .

कौटुंबिक दृष्ट्या हे वर्ष तसं आजारपणांच अन दु:खाचं ठरलं . वर्ष सरताना अनेक जवळच्या अन लाडक्या व्यक्तींचा कायमचा निरोप घ्यावा लागला.अशा अनेक घटना घडल्या ज्याची कल्पनाही वर्षाच्या सुरुवातीला केली नव्हती . त्यामुळेच २०१३ ला निरोप देताना काहीशी दु:खाची किनार आहे पण त्यामुळेच ते अविस्मरणीय देखील झालं आहे . दुख: म्हणजे काय हे खरंतर  तेव्हाच मला नेमकं समजलं . ते पेलण्याची ताकद देईल अश्या अओएक्शेने मी नव्या वर्षाकडे पहात आहे .

अश्या ह्या २०१३ ला निरोप देताना अन २०१४ च्या पूर्वसंध्येला सारे जग आपल्याच आनंदात मग्न असेल . अनेकांचे महिनोंमहिन्याचे ठरलेले plans प्रत्यक्षात आणणं सुरु असेल  अश्या वेळी मला मात्र आपल्या खोलीत एकटच निवांतपणे बसून होऊन गेल्याचा आढावा घेणं मनाला समाधान देणारं ठरलंय .

नववर्षाचे स्वागत करताना झालं गेला विसरून जुन्या चुकांना मागे सारून पुन्हा नव्याने एक नवीन आयुष्य जगायचं आहे खूप काही शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे . संकल्प तर प्रतिवर्षीच केले जातात अन लगेचच मोडलेही जातात त्यामुळेच एखादा विशेष संकल्प न करता रोज काहीतरी नवीन करणं , नवीन शिकणं अन जुने संकल्प कसोशीने पूर्णत्वास नेणं एवढीच माझी स्वत:कडून माफक अपेक्षा आहे .

२०१३ ला निरोप देताना नव्या उत्साहाने अन आनंदाने २०१४ चे स्वागत करायला मी सज्ज आहे .
हे नवे वर्ष मला असेच काहीतरी शिकवणारे अन अनुभव समृद्ध करणारे असावे एवढीच इच्छा !

 - संपदा
  ३१/१२/२०१३




शनिवार, २१ डिसेंबर, २०१३

बालमोहन ...

आता " बाळांनो ,।" अशी प्रेमळ हाक मारणारे कोणी नसेल !
बालदिन अन वार्षिक बक्षीस समारंभाची ती शान नसेल .
इंग्रजीत अस्खलित  संभाषण केल्यावर पाठीवर पडणारी थाप नसेल .
अन सुयश संपादन केल्यावर कौतूकासाठीचा फोन नसेल ।

बालमोहनचा एक आधारवड आता उन्मळून पडलाय …
शाळा हि कधी शाळा वाटलीच नाही मला दुसरे घरच होते ते !
कोणत्याही स्पर्धेला जाताना तुमचे आशीर्वाद आत्मविश्वास वाढवायचे .
यश मिळाल्यावर होणारे कौतुक पाहून  आनंदाश्रू वाहू लागायचे
शाळेसाठी थोडेफार जे करता आले त्याचे समाधान आहेच . काही गोष्टी राहून गेल्या खऱ्या पण शाळेने केलेले संस्कार , लावलेले वळण अन समाजात वावरण्यासाठी उपयुक्त असे ' जगण्याचे ' धडे हि पुंजी अशीच मनात जपून ठेवली जाईल.


Inline image 1


शाळेचे नाव असेच उज्ज्वल करून बालमोहनची पताका अशीच फडकवत ठेवणे हीच खरी आदरांजली ठरेल अन 'बालमोहन'चे  एक बाळ म्हणून मी यासाठी नेहेमीच कटीबद्ध राहीन .
- एक बाळ
  संपदा
  बालमोहन विद्यामंदीर १९९८ - २०१०

  २५/११/२०१२

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

ती गेली तेव्हा …

एक वेगळेच रसायन होते ते ! आजोबांना सतत काम करता यावे म्हणून घराची जबाबदारी  समर्थपणे उचलणारी , मला बरं नसेल तर सारे काम सोडून ठाण्याहून  वरळीला धावत येणारी , रोज छोट्या शाळेत न्यायला येणारी अन् माझे खाण्यापिण्याचे अगणित चोचले पुरवणारी , शेवटच्या काही वर्षांत कायम घरी असल्यामुळे घराला खरं खुरं घरपण आणणारी अशी….  ती "माझी आजी !'

आता रात्री उशिरा घरी गेल्यावर खास माझी वाट बघत जागं असलेलं आपलं माणूस नसेल… 
वेळी - अवेळी भूक लागली तरी प्रेमाने काहीतरी खायला करून देईल असं हक्काचं कोणी नसेल…. 
वेगवेगळ्या वर्तमानपत्रातले लेख खास माझ्यासाठी बाजूला काढून मला वाचायला देणारं अन त्यावर चर्चा करणार असं माझं कोणी नसेल .…
प्रिय आजी ,
               आज तो दिवस आलाच ; पण त्यामुळेच मला भूतकाळात एक फेरफटका मारायची संधी मिळाली :( 
आई - बाबा सकाळी लवकर ऑफिसमध्ये गेल्यावर  गेली जवळपास १७ वर्ष आपणच असायचो सोबत. नेहेमीच. 
जसजशी मी मोठी होत गेले तसं त्याचा स्वरूप बदलत गेलं . अगदी लहान असताना बाबा दादरला सोडायला यायचे तेव्हा तू आंघोळीला गेलेली असलीस आणि आजोबा घरी  असले तरी मी नेहेमीच तू परत येईपर्यंत बाबांना थांबवून ठेवत असे ,  नाही का गं ?
त्या खिडकीखालच्या फळीवर तू भिजत ठेवलेल्या मनुका अन बदाम  खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात होत असे. मग चाळभर भटकण्यात अन् आजोबांनी दिलेले 'वीस'  प्रश्न सोडवण्यात सकाळ निघून जाई .
दुपारी जेवल्यावर केवळ तुला पडायचं असल्याने मग मला झोपवण्याचा प्रयत्न तू नेहेमीच केलास . दुर्दैवाने यात यश कधीच आले नाही . त्यानंतर मग गोष्टी ,  लेख . बातम्या अन् कविता वाचनाचा कार्यक्रम होई अन् मग उनाडक्या करायला मी मोकळी असे . आई न्यायला आल्यावर पटकन तिच्याबरोबर मी निघाल्ये असे कधी झाले नाही कारण तुला सोडून घरी जायचं ही  कल्पना मला तेव्हादेखील सहन होत नसे.
थोडी मोठी झाले अन् छोट्या शाळेत जाऊ लागले. अगदी दररोज न चुकता वेळेआधीच तू मला न्यायला हजर असायचीस . मग चालत परत येताना रानडे रोडवर धमाल करणं असो किंवा तिथल्या गजरेवाल्याच्या दुकानाबाहेर उभं राहून मांजरी मोजणं असो , उन्हाळा जवळ आला की ताडगोळे सोलून घेणं असो अश्या कित्येक गोष्टी जणू अगदी कालच  घडल्यासारख्या !
पुढे माझी शाळेची वेळ बदलली अन् तुम्ही दोघे ठाण्याला राहायला गेलात . खरंच रोज आठवण यायची तुम्हा दोघांची ; पण मग ती कसर दोन्ही सुट्यांमध्ये भरून काढायचो आम्ही तिघेही तुझी लाडकी नातवंड .
ह्या अनेक सुट्यांमध्ये मी स्वावलंबन शिकले आणि बरेच काही . अगदी अंगण साफ करण्यापासून ते भाडेकरूंच्या पावत्या लिहिण्यापर्यंत सगळी कामे केली . खूपच मजा यायची तेव्हा .
नंतर नंतर आजारपणामुळे तू वरळीला राहायला आलीस आणि मग  गेली आठवर्षे आपण कायमच एकत्रच होतो. तू असल्यामुळे मला कधीच एकटं राहावं लागलं नाही . तुझ्यासोबत पाठ केलेल्या कविता , सुभाषिते , श्लोक , तू घेतलेला इंग्रजीचा अभ्यास आणि बरंच काही .
मी स्पर्धात्मक चेस खेळायचे ह्याचा तुला कोण अभिमान  होता . माझ्याबरोबर दिवसदिवस वेगवेगळ्या स्पर्धांच्य ठिकाणी तू सोबत म्हणून यायचीस . तिथल्या राजकारणाशी तोंड देताना माझ्यावर पूर्ण विश्वास ठेऊन पूर्ण पाठींबा द्यायचीस हे कधीच विसरू शकणार नाही मी . मी इथे बंगलोरला आले तेव्हा मला सगळ्यात जास्त तुझीच काळजी होती कारण …… दिवसभर तुझ्यासोबत कोणीच असणार नव्हत पण तू खंबीरपणे ते एकटेपण स्वीकारलस . शेवटचे तीन महिने खरंच  खूप त्रासदायक होते पण त्यातूनही बाहेर पडण्याच्या तुझ्या दुर्दम्य इच्छाशक्तीला खरंच दाद द्यावी लागेल .

तू हा डाव अर्ध्यावर सोडून गेलीस असा नाही म्हणणार मी पण तो पूर्णही नाही केलास .
आज दोन्ही दादांची शिक्षणं पूर्ण झालीयेत दोघेही कमावते झाल्येत मला माहितेय माझ शिक्षण पूर्ण झालेला तुला बघायच होतं . ते समाधान तुझ्या चेहेऱ्यावर बघणं अन तुझा हात मायेने पाठीवरून फिरणं हे मला पुढचा यश मिळवण्यासाठी नेहेमीच स्फूर्तीदायी होतं अन तू नसलीस तरी यापुढेही असेल . आजही मला आठवतंय,  माझा स्कॉलराशिपचा निकाल लागल्यावर तुला झालेला आनंद पाहून जग जिंकल्यासारखा वाटला होता मला !
तू केलेले संस्कार , तुझी शिकवण अन रोजच्या आयुष्यासाठी लावलेल्या काही चांगल्या सवयी ह्याद्वारे तू नेहेमीच माझ्या सोबत असशील .
यापुढेही जे काही मिळवेन ते तुला नेहेमीच आनद देईल
तू जर असशील जिथे असशील तिथून नेहेमीच मला आशीर्वाद देशील अन प्रेमाचा वर्षाव करत राहशील ह्यात शंकाच नाही .
राहून राहून एकच खंत वाटली म्हणजे मी शेवटच्या क्षणी तुझ्यासोबत नव्हते पण तू पाच दिवसांपूर्वी सांगितलेले शब्द अजूनही मला ऐकू येत आहेत " संपदा ,अभ्यास सोडून केवळ मला भेटायला येऊ नकोस !!"
खरंच आजोबाच्या आणि तुझ्या शिकवणीप्रमाणे हे दु:ख बाजूला सारून अभ्यासाकडे लक्ष देणं अन् खूप शिकणं हीच बहुदा तुला खरी श्रद्धांजली ठरेल .
bye bye
तुझीच लाडकी,
- संप्या
  १९/११/२०१३
  बंगलोर 

आरंभ

             गेले काही दिवस ब्लॉग सुरु करायचे मनात होते पण अभ्यास coursework आणि इतर अनेक activities असल्यामुळे वेळच मिळत नव्हता . त्यामुळे सुरुवात जुन्या लिखाणाने करत आहे . अगदी ह्या ब्लॉगच्या नावाप्रमाणेच जे काही मनात आहे ते कागदावर उतरवायचा हा प्रयत्न आहे. अन ह्या लिखाणाच्या प्रांतात तर मी अगदीच नवखी आहे . त्यामुळे माझ्या चुका माफ करून मला सुधारणा सुचवाल एवढीच अपेक्षा !

- संपदा