शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

ती गेली तेव्हा …

एक वेगळेच रसायन होते ते ! आजोबांना सतत काम करता यावे म्हणून घराची जबाबदारी  समर्थपणे उचलणारी , मला बरं नसेल तर सारे काम सोडून ठाण्याहून  वरळीला धावत येणारी , रोज छोट्या शाळेत न्यायला येणारी अन् माझे खाण्यापिण्याचे अगणित चोचले पुरवणारी , शेवटच्या काही वर्षांत कायम घरी असल्यामुळे घराला खरं खुरं घरपण आणणारी अशी….  ती "माझी आजी !'

आता रात्री उशिरा घरी गेल्यावर खास माझी वाट बघत जागं असलेलं आपलं माणूस नसेल… 
वेळी - अवेळी भूक लागली तरी प्रेमाने काहीतरी खायला करून देईल असं हक्काचं कोणी नसेल…. 
वेगवेगळ्या वर्तमानपत्रातले लेख खास माझ्यासाठी बाजूला काढून मला वाचायला देणारं अन त्यावर चर्चा करणार असं माझं कोणी नसेल .…
प्रिय आजी ,
               आज तो दिवस आलाच ; पण त्यामुळेच मला भूतकाळात एक फेरफटका मारायची संधी मिळाली :( 
आई - बाबा सकाळी लवकर ऑफिसमध्ये गेल्यावर  गेली जवळपास १७ वर्ष आपणच असायचो सोबत. नेहेमीच. 
जसजशी मी मोठी होत गेले तसं त्याचा स्वरूप बदलत गेलं . अगदी लहान असताना बाबा दादरला सोडायला यायचे तेव्हा तू आंघोळीला गेलेली असलीस आणि आजोबा घरी  असले तरी मी नेहेमीच तू परत येईपर्यंत बाबांना थांबवून ठेवत असे ,  नाही का गं ?
त्या खिडकीखालच्या फळीवर तू भिजत ठेवलेल्या मनुका अन बदाम  खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात होत असे. मग चाळभर भटकण्यात अन् आजोबांनी दिलेले 'वीस'  प्रश्न सोडवण्यात सकाळ निघून जाई .
दुपारी जेवल्यावर केवळ तुला पडायचं असल्याने मग मला झोपवण्याचा प्रयत्न तू नेहेमीच केलास . दुर्दैवाने यात यश कधीच आले नाही . त्यानंतर मग गोष्टी ,  लेख . बातम्या अन् कविता वाचनाचा कार्यक्रम होई अन् मग उनाडक्या करायला मी मोकळी असे . आई न्यायला आल्यावर पटकन तिच्याबरोबर मी निघाल्ये असे कधी झाले नाही कारण तुला सोडून घरी जायचं ही  कल्पना मला तेव्हादेखील सहन होत नसे.
थोडी मोठी झाले अन् छोट्या शाळेत जाऊ लागले. अगदी दररोज न चुकता वेळेआधीच तू मला न्यायला हजर असायचीस . मग चालत परत येताना रानडे रोडवर धमाल करणं असो किंवा तिथल्या गजरेवाल्याच्या दुकानाबाहेर उभं राहून मांजरी मोजणं असो , उन्हाळा जवळ आला की ताडगोळे सोलून घेणं असो अश्या कित्येक गोष्टी जणू अगदी कालच  घडल्यासारख्या !
पुढे माझी शाळेची वेळ बदलली अन् तुम्ही दोघे ठाण्याला राहायला गेलात . खरंच रोज आठवण यायची तुम्हा दोघांची ; पण मग ती कसर दोन्ही सुट्यांमध्ये भरून काढायचो आम्ही तिघेही तुझी लाडकी नातवंड .
ह्या अनेक सुट्यांमध्ये मी स्वावलंबन शिकले आणि बरेच काही . अगदी अंगण साफ करण्यापासून ते भाडेकरूंच्या पावत्या लिहिण्यापर्यंत सगळी कामे केली . खूपच मजा यायची तेव्हा .
नंतर नंतर आजारपणामुळे तू वरळीला राहायला आलीस आणि मग  गेली आठवर्षे आपण कायमच एकत्रच होतो. तू असल्यामुळे मला कधीच एकटं राहावं लागलं नाही . तुझ्यासोबत पाठ केलेल्या कविता , सुभाषिते , श्लोक , तू घेतलेला इंग्रजीचा अभ्यास आणि बरंच काही .
मी स्पर्धात्मक चेस खेळायचे ह्याचा तुला कोण अभिमान  होता . माझ्याबरोबर दिवसदिवस वेगवेगळ्या स्पर्धांच्य ठिकाणी तू सोबत म्हणून यायचीस . तिथल्या राजकारणाशी तोंड देताना माझ्यावर पूर्ण विश्वास ठेऊन पूर्ण पाठींबा द्यायचीस हे कधीच विसरू शकणार नाही मी . मी इथे बंगलोरला आले तेव्हा मला सगळ्यात जास्त तुझीच काळजी होती कारण …… दिवसभर तुझ्यासोबत कोणीच असणार नव्हत पण तू खंबीरपणे ते एकटेपण स्वीकारलस . शेवटचे तीन महिने खरंच  खूप त्रासदायक होते पण त्यातूनही बाहेर पडण्याच्या तुझ्या दुर्दम्य इच्छाशक्तीला खरंच दाद द्यावी लागेल .

तू हा डाव अर्ध्यावर सोडून गेलीस असा नाही म्हणणार मी पण तो पूर्णही नाही केलास .
आज दोन्ही दादांची शिक्षणं पूर्ण झालीयेत दोघेही कमावते झाल्येत मला माहितेय माझ शिक्षण पूर्ण झालेला तुला बघायच होतं . ते समाधान तुझ्या चेहेऱ्यावर बघणं अन तुझा हात मायेने पाठीवरून फिरणं हे मला पुढचा यश मिळवण्यासाठी नेहेमीच स्फूर्तीदायी होतं अन तू नसलीस तरी यापुढेही असेल . आजही मला आठवतंय,  माझा स्कॉलराशिपचा निकाल लागल्यावर तुला झालेला आनंद पाहून जग जिंकल्यासारखा वाटला होता मला !
तू केलेले संस्कार , तुझी शिकवण अन रोजच्या आयुष्यासाठी लावलेल्या काही चांगल्या सवयी ह्याद्वारे तू नेहेमीच माझ्या सोबत असशील .
यापुढेही जे काही मिळवेन ते तुला नेहेमीच आनद देईल
तू जर असशील जिथे असशील तिथून नेहेमीच मला आशीर्वाद देशील अन प्रेमाचा वर्षाव करत राहशील ह्यात शंकाच नाही .
राहून राहून एकच खंत वाटली म्हणजे मी शेवटच्या क्षणी तुझ्यासोबत नव्हते पण तू पाच दिवसांपूर्वी सांगितलेले शब्द अजूनही मला ऐकू येत आहेत " संपदा ,अभ्यास सोडून केवळ मला भेटायला येऊ नकोस !!"
खरंच आजोबाच्या आणि तुझ्या शिकवणीप्रमाणे हे दु:ख बाजूला सारून अभ्यासाकडे लक्ष देणं अन् खूप शिकणं हीच बहुदा तुला खरी श्रद्धांजली ठरेल .
bye bye
तुझीच लाडकी,
- संप्या
  १९/११/२०१३
  बंगलोर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा