रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५

ऐलमा पैलमा - . . . - Happy Birthday to you

नवरात्र आणि ऑक्टोबर महिना म्हटल्यावर मला सगळ्यात आधी आठवणारी गोष्ट म्हणजे भोंडला ! 

बरीच म्हणजे साधारण मी लहान असताना ५ - ६ वर्ष सलग आम्ही घरी भोंडला केला मग मी मोठी झाले शाळेच्या परीक्षादेखील ह्याच सुमारास यायच्या आणि मग ही एक सुंदर प्रथा आमच्या घरापुरती बंद पडली.
माझा वाढदिवस बऱ्याचदा नवरात्रीत येत असे आणि लहानपणी पाश्चात्य पध्धतीने वाढदिवस साजरे केलेले मला आवडत नसत मग भोंडल्याच्या निमित्ताने वाढदिवस साजरा व्हायचा आणि वेगळीच मज्जा यायची.
आदल्या आठवड्यात hall मध्ये सामानाची rearrangement करून भोंडल्याचा फेर धरता येईल इतकी जागा आम्ही करून ठेवायचो.

सोसायटीमधल्या सगळ्या तायांना संध्याकाळी यायचं आमंत्रण आईने दिलेलं असे. ( माझ्या वयाचं किंवा लहान तेव्हा कोणीच नव्हतं! ) सकाळीच आजी घरी यायची आणि काहीतरी माझ्या आवडीचा पदार्थ खिरापत म्हणून करून ठेवायची.

माझ्याकडे एक खेळण्यातला लाकडी हत्तीचा पुठ्ठा होता. मग त्या हत्तीला एका पाटावर ठेवून त्याभोवती एखादी ताई खडूने छोटीशी रांगोळी काढत असे. सगळे त्यांच्या आयांसकट जमले की आमचा भोंडला सुरु व्हायचा. सुरुवात अर्थातच ' ऐलमा पैलमा गणेश देवा… ' म्हणून होत असे आणि मग एक - एक गाणी म्हटली जात. आजीला बरीच गाणी पाठ होती त्यामुळे ती म्हणताना -  त्यातले विनोद , उपहास आणि मुलींच्या सासरच्या मंडळींवरच्या गंभीर टिप्पण्या समजून घेताना त्या वयात मज्जा यायची -काळ किती बदललाय हे जाणवायचे.

सगळे दमले की मग सगळ्यात महत्त्वाचा खिरापत ओळखण्याचा खेळ सुरु व्हायचा. मग अगदी चव - वास - रंग - रूप सगळे प्रश्न स्वयंपाकघरात विचारले जायचे. आई - आजी आम्हाला ओळखता येणार नाही अश्या पद्धतीची उत्तरं देत खिंड लढवायच्या. कधीतरी जी व्यक्ती ती खिरापतआणायची ती भलतेच प्रश्न विचारून / उत्तरे देऊन दिशा बदलायचा प्रयत्न करत असे. आणि सगळ्या खिरापती ओळखल्याशिवाय वाढदिवसाचा केक कोणालाच मिळत नसे त्यामुळे सगळी मजा खिरापत ओळखण्यात ! डोकं चालवायला कसली मज्जा यायची तेव्हा

पुढे एक वर्ष काहीतरी झालं म्हणून जमलं नाही आणि मग पुन्हा कधी तसं काही झालं नाही. आता बरीचशी गाणीसुद्धा विसरले आहे कधीतरी लिहून काढायला हवीत आणि online साठवायला हवीत.

वाढदिवस असेच येत गेले पुढेही येतील. उगाचच यंदाही नवरात्र सुरु असल्यामुळे ह्या जुन्या आठवणींची नोंद करून ठेवावीशी वाटली :)

अगदी लहान असताना आजी औक्षण वगरे करत असे नंतर वाढदिवस हे केवळ पेस्ट्रीज खाण्यापुरते उरले. शाळेत आम्ही coffee bite वाटायचो .  इथे IISc मध्ये आले तेव्हा आम्ही आमच्यातला पहिला वाढदिवस अगदी केक आणून  साजरा केला त्यामुळे माझे मित्र - मैत्रिणीसुद्धा माझ्या वाढदिवसाला तेच करत.तीच पद्धत पडली जणू ! पहिल्या वर्षी ठीक होतं पण नंतर लक्षात आलं formality म्हणून मित्र - मैत्रिणी येतात. ( असं आम्ही इतरांच्या वाढदिवसाला observe केलं म्हणून लक्षात आलं ! )
बऱ्याचदा माझे  खास असे दोस्त नसल्यामुळे माझा वाढदिवस गेली दोन वर्ष विसरताहेत :) . साजरा करू नका असं थेट सांगताही येत नाही अन् खोटं सतत हसता येत नाही ( म्हणून इथे नोंद करून ठेवत्ये ! )
इथून पुढे कदाचितपद्धत बदलेल किंवा साजरेपण संपेल पाहूया :)

' जे जे होईल ते ते पाहावे चित्ती असू द्यावे समाधान ।' हेच खरं !


१८ ऑक्टोबर २०१५
( सुज्ञास सांगणे न लागे ;p )

५ टिप्पण्या:

  1. खूपच छान लिहील आहेस. माझ्या देखील स्मृती जागवल्या. तुझ्या वाढदिवसाला मी सुद्धा भोंडल्याचा खूप आनंद घेतला. मला अजूनही भोंडला करायला आवडेल. वाढदिवसाची मजा आपल्या घरापुती खूपच होती, विशेष म्हणजे आजीबरोबर मज्जा यायची केक खाण्यातली मजा. तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला तिने पण खूप मजा घेतली. तुझ्या प्रत्येक वाढदिवसाचा आणि त्याबरोबर मिळणाऱ्या यशाचा मनसोक्त आनंद तिने घेतला. तू iisc मध्ये गेलीस आणि तिचा आनंद माळवला... पण तरी माझी नात एका चांगल्या संस्थेत गेल्याचा तिला खूप अभिमान होता. .. तू म्हणजे तिचे सर्वस्व होतीस ... असो... आता पदवीधर होऊन येशील तेंव्हा आपण आईच्या पद्धतीने तुझा वाढदिवस साजरा करू.... या वाढदिवसापासून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिक... अभ्यासातील मजा
    पूर्वीसारखीच घे... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिहिलास त्याचा खूप आनंद झाला आहे. ...लिहिते रहो. व्यक्त होण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे लिखाण .... ते चालू ठेव.
    वाढदिवसाच्या शुभेच्छा व अनेक आशीर्वाद ... आई.

    उत्तर द्याहटवा
  2. नवरात्रात वाढदिवस आणि त्याबरोबर भोंडल्याची मजा वाचून मन प्रसन्न झाले. वाचताना चित्र डोळ्यासमोर उभे राहिले !

    उत्तर द्याहटवा
  3. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा