गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

दीपावली : एक मुक्त चिंतन

शुभ दीपावली आणि नववर्षाच्या शुभेच्छा !

असाच थोडा विचार करत बसले होते अन् विचारांची मुक्त उधळण सुरु झाली मनात . थोडीशी विस्कळीत थोडीशी आठवणीनी ओथंबलेली . आणि मग उतरवली अनुदिनीवरल्या ह्या कागदावर … 

दिवाळी दिवाळी म्हणजे नेमकं काय ?

सध्यापुरता विचार केला तर गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून माझ्यासाठी हा एक सुटी असलेला दिवस ह्याशिवाय तरी काही वेगळे महत्व नाही या दिवसाचं !

आजोबा असताना मी शाळेत असल्यामुळे मोठी सुटी मिळे आणि पूर्ण दोन आठवडे ठाण्याला जाऊन राहता येई .आजी आणि दोन्ही दादांबरोबर रांगोळी काढणे,  किल्ले बघायला जाणे अन भर दुपारी उन्हात मनसोक्त खेळणे असे ते सुंदर दिवस होते . याहीपेक्षा आजोबांसोबत दिवाळीच्या सुटीतला अभ्यास करायला मिळायचा. खूप मजा यायची या सुटीच्या दिवसांत . कितीतरी नवीन पद्धती , गणितातील गमती - जमती , लिखाणाचा सराव , मुद्रितशोधानात त्यांना केलेली मदत अन् दिवाळीच्या वहीसाठी लढवलेली कल्पकता हीच खरी  दिवाळी असायची माझ्यासाठी.केवढा शिकायला मिळलय तेव्हा आजोबांकडून ! दिवाळीची वही सजवताना , अगदी एक साधा कागद वहीत कमीत कमी गोंद वापरून कसा नीट चिकटवायचा इथपासून ते अगदी डोळ्यासमोर उभे राहील असे प्रवासवर्णन सोप्या शब्दात कसे लिहायचे किवा पत्र कसे लिहायचे हे सारे नकळत शिकायला मिळाले आजोबांकडून ह्या जेमतेम ५-६ दिवाळीच्या सुट्यांमध्ये . अशाच बहुदा त्यांच्या शेवटच्या दिवाळीत आयडियलकडे मागवून घेतलेली अन मला काही पूर्वकल्पना न देता माधुरी पुरंदरे ह्यांची "वाचू आनंदे " हे पुस्तकांची मालिका  वाढदिवस आणि दिवाळी भेट म्हणून त्यांनी घेतली होती . ती आजवरची मला मिळालेली सगळ्यात मौल्यवान अन खूप काही शिकवुन गेलेली अशी विशेष दिवाळी भेट ठरली. 
नावापुरते आणि आमची हौस भागवायला २-४ अनार ,  एखादे भुईचक्र आणि फुलबाज्यांचा एक खोका हे आणि एव्हढेच फटाके घाबरत घाबरत आई - बाबा , आजी - आजोबा,  मावशी - काका आणि दोन्ही दादांसोबत अंगणात फोडायचो . कसं कोण जाणे पण फटक्यांमुळे प्रदूषण होते इ  गोष्टी मला त्या लहान वयातही समजत होत्या . केपा आणि त्यांच्या बंदुका घेऊन मात्र आम्ही बरेच दिवस वेगवेगळे चोर शिपाई आणि इतर मारामारीचे खेळ वाडाभर उंडारत खेळत असू . आजोबा गेले अन् त्यावर्षी फटाके आणण्याचे थांबवले ते थांबवलेच . नंतरही कधीतरी आईने एकदोन फुलबाज्या आणल्या होत्या ; पण ती मजा नसल्यामुळे इच्छाच झाली नाही फटके फोडायची . पणत्या आणून त्या रंगवणे हाही एक उपक्रम मात्र नंतर बरेच वर्ष मी केल्याचं मला चांगलंच आठवतंय . 

आजोबा गेल्यावरही आजीसोबत ह्यातल्या बऱ्याच गोष्टी दर दिवाळीच्या सुटीत होत असत पण ती मजा पुन्हा कधीच आली नाही . नंतर नंतर अभ्यास वाढत गेला अन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यात ही सुटी संपू लागली पण त्यात एक वेगळी मजा  होती ज्ञान मिळवण्याची अन यश संपादन करण्याची .
पण ह्या साऱ्यात एक अत्यंत समान धागा होता ज्यात माझा बराचसा वेळ व्यतीत होई  तो म्हणजे "दिवाळी अंक " किमान दहा अंकांचे वाचन झाल्याशिवाय समाधानच होत नसे. मग ते अगदी चंपक किशोर पासून ते मोठ्यांच्या मासिकातील त्या वयात वाचण्याजोग्या कथा अन मुलाखती असोत . पुढे पुढे गाडी चांदोबा वगैरेंवरून एकदम पत्रिका , छात्र प्रबोधन यांवर येउन थांबली. पण ह्या अंकांनी जणू व्यक्तिमत्व घडणीत फार मोठा मोलाचा वाटा  उचलला . समाज म्हणजे काय ह्याचे भान हळूहळू ह्यातून येत गेले. माणसांच्या चित्रविचित्र स्वभावाचे निदान theoretically ज्ञान होत गेले .दिवाळी अंकांची चाहूल मला पार कोजागिरी पासून लागत असे. कोणताही अंक माझ्याशिवाय कोणी उघडायचा नाही ह्या एका कारणावरूनच काय तो हट्ट - चिडचिड आणि रडणं होत असे. दिवाळी म्हणजे दिवाळी अंक हे जवळ जवळ bijective Function जणू ! 

हळू हळू मोठी होत गेले तसा आता वर्षभर खात असलेल्या चिवडा - लाडू चकलीचे दिवाळीपुरते पूर्वी असलेले महत्व कमी झाल्याने, घरातल्या अनेक मधुमेहींमुळे एकूणच गोड मिठाई आणि इतर पदार्थ खाण्यातला कमी झालेला उत्साह , वर्षानुवर्षे पाहिलेली दादरची खरेदीची गर्दी आणि आधीच गरज भागेल इतके असलेले कपडे ह्यांमुळे नवीन कपडे वगरे बद्दल असलेली अनास्था , कुटुंबीयांनी एकत्रित भेटण्यासाठी नसलेला वेळ आणि मुंबईत होणाऱ्या प्रचंड प्रदूषणामुळे होणारी चिडचिड … एकूणच ह्या अनेक घटकांमुळेच दीपावली साजरी करण्यात फोलपणा आहे असेच काहीसे वाटू लागले . घरी तसेही कोणत्याच सणाचे प्रस्थ - पूजा - अर्चांचे अवडंबर नव्हतेच . कदाचित त्यामुळेच मी मनातून ह्या  दिखाऊ साजऱ्या उत्सवापासून कायमच दूर दूर जात राहिले .

गेली तीन वर्षे मात्र इथे वेगळ्याच विश्वात असल्याने दिवाळीचातसा विशेष गंधही नाहीये. नवीन कपडे घालणे अन केवळ आपली संस्कृती , पूजा - अर्चा … अशा दृष्टीकोनातून मी कोणत्याच सणाकडे अन विशेषत: दिवाळीकडे आजतागायत पहिले नसल्यामुळेच  असेल कदाचित पण राहिलेला अभ्यास संपवण्यासाठी मिळालेली एक बोनस सुटी अशी माझी मानसिकता झालीये . फारतर आंतरजालावर प्रसिद्ध होणारऱ्या दिवाळी अंकाचे वाचन एवढाच माझा काय तो दिवाळीशी संबंध . 
आम्ही सगळीच भावंडं वेगवेगळ्या शहरांत आणि आपापल्या कामात व्यग्र आहोत . आणि . . आता आजीही नाही :( आम्हाला सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवणारा हा महत्वाचा दुवाच निखळलाय. यंदापासून तिची दरवर्षी होणारी भाऊबीजही आता ह्यापुढे नसेल . माझी दृष्ट काढायला ते सुरकुतलेले मऊ हात नसतील अन् मुख्य म्हणजे मी पुढच्या सुटीत घरी जाईपर्यंत माझ्यासाठी खुणा करून ठेवलेल्या दिवाळी अंकातले लेख नसतील . छात्र प्रबोधनच्या अंकाला कुणीच स्पर्श केलेला नसेल . आई - बाबा देखील बहुदा कार्यालयातून मिळालेली ही सुटी इतर कामे करण्यासाठीच वापरत असतील.

खरंतर सगळी मजाच जणू निघून गेलीये आता दिवाळीतली. इथे सगळ्या मैत्रिणी sweets , new dresses , पूजा , lamps अश्या चर्चा करत असताना त्यात सहभागी व्हायची अजिबात इच्छा नाहीये . त्यात एकाच समाधान म्हणजे आज एक नवीन दिवाळी अंक वाचायला मिळाला . अक्षरश : झपाट्याने वाचून काढला अन् वाटले हीच माझी यंदाची दीपावली . 


गेले ते दिन गेले म्हणत त्या जुन्या आठवणीत रमायचे अन् पुढील अभ्यासासाठी सज्ज व्हायचे यासाठी घेतलेला एक थांबाच जणू …

- Sam

ऑक्टोबर २३ , २०१४
लक्ष्मीपूजन

रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

पूर्णविराम : एका वेगळ्या प्रवासाला

१४ सप्टेंबर २०१३
अचानक संध्याकाळी एक धक्का बसला . एक जबाबदारी अंगावर पडली !  हे सगळा इतकं अनपेक्षित होतं की तेव्हा कसलाच विचार केला नव्हता . डोक्यात विचारचक्रे सुरु झाली होती पण ; पुढे काय होणार आहे हे तेव्हा कळणार तरी कसे होते ! त्या वेळी  आधीच इतक्या गोष्टीत मी गुंतलेले होते की एक चेंलेंज स्वीकारावं तसा काहीसं डोक्यात नोंदले गेले ते क्षण ! 



१४ सप्टेंबर २०१४
 खरंतर ज्या क्षणी मी हे उतरवत आहे त्याच सुमारास हे घडलं . आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालंय .

सुरुवातीला वाटणारी नसती कटकट नंतर खरंच आनंद देऊन गेली . कधी चेंलेंज म्हणून तर कधी मजा म्हणून जे जे जमेल ते करत गेले .
सगळ्यांपेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असूनसुद्धा माझ्यावर कोणीतरी विश्वास टाकला होता माझ्यापरीने मी तो सार्थ ठरवलाय. भल्यासाठी  जितकं जमेल तितकं केलंय . चुका माफ नक्कीच होतील

अनेकांना सोबत घेऊन काहीतरी यशस्वी करणं हे सोपं नसतं  विशेषत : मुलींना , ह्याची जाणीव ह्या प्रवासात झाली .
अनेक हात सोबतीला  पण तोंडं चार दिशांना अश्या परिस्थितीत खंबीरपणे मार्ग कसा काढायचा हेही ह्यानिमित्ताने उमगलं. प्रवाहाविरुद्ध पोहताना अनेक अडचणी असल्या तरीही त्यात एक वेगळी मजाही असते हे समजलंय .
कधी चुकले , कुठे अडखळले. कधी एकटीनेच मार्ग काढला तर कधी कोणाच्या सोबतीने . मार्गदर्शन करायला अनेकांची साथ अन् भरभक्कम पाठींबा वेळोवेळी होताच . त्याशिवाय हे निभावणं शक्यही झालं नसतं .

 एका जबाबदारीतून मुक्त झाले . दिवस - रात्र एक करून , जेवण विसरून करावे लागणारे कामही नसेल . उरल्यात त्या फक्त गेल्या वर्षभरातल्या  कडू - गोड आठवणी . निरोपाचे दु:ख निश्चितच नाही . पण जोडला  गेलेला  मित्रपरिवार  दुरावेल ह्याचे वाईट नक्कीच वाटतंय .

अशी हि अनुभवांची शिदोरी घेऊन आता पुढे वाटचाल करणार आहे .

अगदी मुक्तपणे .. . .

- संपदा



रविवार, १० ऑगस्ट, २०१४

३ राख्यांची गंमत

आज रक्षाबंधन !
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत नियमितपणे साजरा केला जाणारा एक सण !

आषाढीनंतर शाळेला असणारी बहुदा पहिलीच सुटी ,खरंतर या सणापासून जे सुट्यांचे सत्र सुरु होई ते बहुदा दिवाळीनंतरच संपत असे म्हणून खासच अप्रूप होते मला ह्या सणाचे !
केवळ बहिणीनेच भावाला राखी बांधायची हे काही मला कधीच पटले नाही. माझ्या आवडीच्या राख्या घ्यायच्या / तयार करायच्या आणि त्या बांधणार मात्र माझे दोन बंधुराज ही संकल्पनाच मला सहन होत नसे अन् म्हणूनच मी नेहेमीच ३ राख्या घेत असे . दोन दादांना बांधत असे अन शेवटची एक त्यांच्याकडून बांधून घेई ! अगदी दुसऱ्या दिवशी  शाळेत जाताना देखील बऱ्याचदा मी ती राखी काढत नसे .
गेली काही वर्षे आम्ही तिघे तीन वेगवेगळ्या शहरात राहत आहोत त्यामुळे प्रत्यक्ष रक्षाबंधन काही होत नाही . केवळ मेलद्वारे राखीची इमेज पाठवली आज अन मग अचानक तीन राख्यांची गंमत आठवली आणि मेल पाठवताना स्वत:लाच CC करायला हवा होता का असा विचार करत बसले  :D



- Sam

( राखी आंतरजालावरून साभार )

सोमवार, ७ जुलै, २०१४

काही क्षण . . . १ ( Wimbledon Final 2014 )

काल बऱ्याच वर्षांनी अशी ठाण मांडून वगैरे टेनिसची match बघितली . अप्रतिम झाली . फेडरर हरला ह्याचे दु:ख आहेच परंतु तो काही वर्षांपूर्वी बहरत असताना जसा खेळायचा तसाच अगदी पुन्हा बघायला मिळाला .

गंमत म्हणजे बाबांसोबत laptop समोर ६.३० पासून ते रात्री १०. ३० पर्यंत असं पसरून बसलेलं असताना आईने एकदाही हटकलं नाही किंवा माझ्या आरोळ्या आणि आरडा-ओरडा ऐकून रागावली नाही त्यामुळे तर ह्या सगळ्याची मजा अजूनच वाढली  : ) 

अप्रतिम सर्विसेस ,सर्व - वॉली , विचार करून केलेले अप्रतिम प्लेसिंग्स , पासिंग शॉट्स , रंगलेल्या rallies , फेडीने वाचवलेले match points , सामना ४ थ्या सेटमध्ये न गमावता शेवटपर्यंत दिलेली झुंज !! अहाहा !
असे सामने इतक्या सहजी बघायला मिळत नाहीत .

फेडरर हरला त्याचे खूप वाईट वाटले पण ज्या जिद्दीने त्याने पुढच्या वर्षी इथे येईन हे म्हटले ते पाहून वाटले हा मनुष्य wimbledon जिंकल्याशिवाय काही निवृत्ती घेत नाही ! सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे हा रडूबाई काल रडला नाही, कदाचित सध्या तो जिंकण्या हरण्यापेक्षाही आनंदासाठी खेळतोय हेच त्याला दाखवून द्यायचे असेल . तो हरला हे पाहून मलाच खरतर प्रचंड वाईट वाटलं होतं तिथे त्या बिचार्याचे काय झाले असेल ! Better luck next time dear Federer !

( इंटरनेटवरून साभार )

सहसा घरी असताना रविवारी संध्याकाळी सी- फेसला जाणं मी कधीच चुकवत नाही पण काल मी गेले नाही ह्याचं अजिबात दु:ख नाही याउलट अप्रतिम सामना बाबांसोबत running commentary ( खरंतर चीत्कारणे )  करत पाहताना खूप मज्जा आली .

Thanks Federer and Djokovick for the great match !

शनिवार, ७ जून, २०१४

आठवणीच्या चिंध्या


काल दुकानात प्रिंटआउट काढण्यासाठी गेले होते . तेव्हा माझ्या  job च्या कागदांच्या ह्या चिंध्या दिसल्या अन् जूने दिवस आठवले ! तिथल्या मुलाने हा सारा कचरा फेकून द्यायच्या आत मी जवळजवळ तिथून हिसकावून घेतला आणि माझ्या पिशवीत कोंबला . माझा सहकारी माझ्याकडे बघतच राहिला पण त्याला काहीच कळणार नव्हते माझ्या मनात त्या क्षणी काय चालू होते ते !


माझे मन जवळजवळ १५ वर्षे मागे गेले . म्हणजेच मी तेव्हा साधारण ३ - ४ वर्षांची असेन. बाबांच्या ऑफिसात जायचं ह्याचं खूपच अप्रूप असे तेव्हा . दरवर्षीचा दसरा  वगळता एखादी वारी होई माझी तेथे . पण तिथे गेल्यावर अश्याच कागदाच्या चिंध्यांचा डोंगर दिसत असे . त्यावर जाऊन उड्या मारणे , त्यातल्या वेगवेगळ्या आकाराच्या चिंध्यांचे मासे तयार करणे आणि अनेक चिंध्या सोबत घरी घेऊन येणे हे माझे आवडते उद्योग !
बाईंडर काका देखील अगदी प्रेमाने मला हे सारे करू देत . कधी कधी मग प्रिंटर काका मला एखाद्या कागदांच्या उंच गठ्ठ्यावर बसवत . मग सगळ्या प्रेस मध्ये काय चाललं आहे हे तिथून मला दिसे . त्या छपाई यंत्राचा तो एका लयीतला कागद उचलताना होणारा आवाज आणि मग हळूच सरकत जाऊन शुभ्र अंगावर रंगीत नक्षी लेवून खाली पडणारा तो कागद ! खूपच अचंबा वाटायचा मला साऱ्याचा . मशीनही अजस्त्र वाटत असे . दसऱ्याच्या दिवशी सजलेली यंत्रे अन् हत्यारे , रंगाचे डबे , cutting machine त्याच्या वेगवेगळ्या blades ह्याची सारे कामगार अगदी मनोभावे पूजा करत . त्या दिवशी साधा कागदाचा तुकडाही पवित्र वाटत असे !

पुढे जशी वर्षे गेली तसा प्रेससुद्धा घराजवळ आला अन मग मी बऱ्याचदा इंटरनेट साठी किंवा सहजच तिथे जात असे. आर कधी यंत्र चालू नसेल तर ती शांतताही त्रासदायक वाटत असे इतका त्या यंत्राचा आवाज परिचित आणि आपलासा वाटत असे मला !

हळूहळू बाबांचे बोलणे ऐकून मीदेखील हे यंत्र कसा चालतं हे समजू लागले होते . ढगाळ वातावरणात कागदावर चुण पडू नये म्हणून छपाई करत नाहीत , दोर्याने शिवलेली पुस्तके गमिंग केलेल्या पुस्तकांपेक्षा अधिक काळ टिकतात , कागद हळुवार उचलावा अन्यथा त्याच्या कडांनी हाताला चिरा जातात , कागद कापताना खाली पुठ्ठा ठेवावा असे अर्धवट ज्ञान मलाही झाले ! गमिंग आणि पेस्टिंग कसा करतात , एखाद्या वस्तूला / वही - पुस्तकाला व्यवस्थित कव्हर कसे घालावे हे जणू तज्ञ व्यक्तीकडून शिकायला मिळाले . अगदी साधी छपाई करताना देखील कागद कसा वाचवावा ह्याचेही बाळकडू मला मिळाले . ह्या सगळ्या गोष्टी शिकताना एक मात्र झाले खूपच मोठ्या प्रमाणात सतत कागद बघितल्याने कदाचित मी त्याच्या काटकसरी वापराबाबत प्रचंड बेफिकीर झाले आहे .

हे सारे असले तरीही मला नेहेमी वाटत असे की ह्या सार्या informal शिक्षणाचा मला उपयोग तो काय ! पण गेल्या साधारण वर्षभरात ह्या माझ्या गृहितकाला धक्काच बसला . pravega साठीचे प्रिंटींग जास्तीत जास्त चांगले करताना , scipher साठीचे packing करताना, कागद भरभर कापताना किंवा अनेक गठ्ठे उचलून नेताना , बक्षिसे wrap करताना जेव्हा मी भरभर ही  कामे इतरांपेक्षा दुप्पट वेगाने अक्षरश: उरकते तेव्हा मला जाणवतं की केवळ आणि केवळ बाबा अन् graphitec मुळेच आणि बाबांकडून मिळालेल्या अनौपचारिक ज्ञानामुळे हे मला जमू शकतंय . ह्या साऱ्याबद्दल मी कायमच त्यांची आभारी असेन .

खरंतर छपाई केवळ माझे बाबाच नाहीत तर आई अन् आजीने देखील ( indirectly आजोबा सुद्धा ) एक उद्योग - धंदा म्हणून कोणत्या न कोणत्या प्रकारे अन् त्यांच्या जीवनात एकदातरी केली आहे . म्हणूनच मी ह्या क्षेत्राशी सध्या थेट संबंधित नसले तरीही मलाही आयुष्यात कधी न कधी छपाई संदर्भात काहीतरी करायला नक्कीच आवडेल .

कित्येक वर्षे झाली सतत धावणाऱ्या त्या यंत्राचा आवाज शेवटचा ऐकून !
रंगांच्या डब्याचा अन् केरोसिनचा तो सुवास आजही मनात दरवळतो आहे .
रोलर पुसण्यासाठी लागणाऱ्या कापडाच्या चिंध्या माझ्या खोलीत आपण कधीतरी वापरले जाऊ म्हणून आजही वाट बघत आहेत !
कागद / चित्रे कापून चिकटवताना मागे उरणाऱ्या चिंध्या कचऱ्यात जाण्याआधी टेबलावर अनेक दिवस रेंगाळणे नेहेमीचेच आहे .
काल मला मिळालेला हा चिंध्यांचा गुंता अनेक दिवस माझ्याकडेच मुक्काम करणार आहे . ह्या जुन्या रम्य विश्वाची सफर सतत घडवून आणणार आहे
परंतु
 आता  ह्या आठवणीच्या चिंध्या पुन्हा जोडून एकसंध चित्र तयार करून त्या दुनियेत प्रत्यक्षात जाता येणार नाही हे सत्य अस्वस्थ करत राहणार आहे .

 - Sam

मंगळवार, २७ मे, २०१४

बुद्धीचे 'बळ' !


Just played a Chess game with my aai ! I had nothing in front except a paper and a pen but she had a board in front. Surprisingly I managed to go till the end - game and she resigned as I had 2 pawns extra !!

I played such a game almost after many years. This game was some 3o odd moves and I was happy at the end for keeping my clean record against her.

When i was a kid and was learning, my sir used to show me some game and he used to ask me to repeat it entirely. I also had played a few blind-fold games with my baba but I had hardly succeeded to achieve some reasonable position. But this was few years back !
Good old memories !

Going to have fun recalling all that while going to bed.

Felt like sharing that game so here it is !
 ( Indirectly its getting preserved else possibly I would have lost  that sheet  )
White : My mother 
Black : Me 


I know I made many mistakes in this game but I really enjoyed it and thus felt like sharing it here !

बुद्धिबळाने मला खूप काही शिकवलंय ! अगदी विचार कसा आणि किती करावा पासून ते खेळातील राजकारणापर्यंत सारे काही. लहानपणी मी खूप  खेळले.  खेळण्यातली मजा अनुभवत होते पण ; अश्याच एका क्षणी मी स्पर्धात्मक खेळणं सोडून दिलं पण तरीही ह्या खेळाबद्दलचं प्रेम आणि आकर्षण कधीच तसूभरही कमी झाले नाही !

आज पुन्हा तो निखळ 'आनंद' अनेक दिवसांनी अनुभवला.
 काही महिन्यातच आनंद आपल्याला पुन्हा आनंद देईल अन जगज्जेता होईल हीच  आशा


- Sam
(  बरेच काही आहे मनात परंतु कागदावर उतरवण्यासाठी सध्या वेळ नाही तूर्त इतकेच ) 

रविवार, २० एप्रिल, २०१४

माझा (?) मतदारसंघ !

मी बंगलोरमध्ये असताना १८ वर्षांची झाले अन इथे लगेचच विधानसभेची निवडणूक होती त्यामुळे सध्याचा माझा मतदारसंघ आहे "मल्लेश्वरम - बेंगळूरू उत्तर " पण तरीही माझा खरा मतदारसंघ -  जुना दक्षिण मध्य मुंबई म्हणजेच २००९ च्या फेररचनेनंतरचा नवीन दक्षिण मुंबई शहर हा मतदारसंघ !

येत्या २४ तारखेला येथे  मतदान होणार आहे . हा मतदारसंघ (जेंव्हा दक्षिण मध्य मुंबई होता तेव्हा ) गिरणगावाचा समावेश असल्यामुळे आणि मनसे तेव्हा स्थापन झालेली नसल्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे . मोहन रावले ह्यांचा हा परंपरागत मतदारसंघ होता परंतु २००९ साली झालेली पुनर्रचना आणि मनसेने बाळा नांदगावकर ह्यांना दिलेली उमेदवारी ह्यांमुळे मतविभागणी होऊन मिलिंद देवरा ह्यांचा विजय सुकर झाला . मिलिंद देवरा ह्यांच्यासाठी ही  निवडणूक चुरशीची होती परंतु मतविभागणीमुळे विजय अक्षरश: सोपा झाला होता . इतर मतदारसंघांप्रमाणेच इथेही मनसे + शिवसेना > कॉंग्रेस हेच चित्र होतं . यंदाच्य आप पक्षाच्य उमेदवार मीरा सन्याल ह्या स्वतंत्र उमेदवार म्हणून उभ्या होत्या अन त्यानाही १० हजाराच्या आसपास मते मिळाली होती .

यंदाची परिस्थिती पाहता अन मीरा सन्याल ह्यांना गेल्या वेळी मिळालेली मते पाहता निवडणूक तिरंगी न होता चौरंगी होईल असा अंदाज आहे . मनसे - शिवसेना हि विभागणी अपरिहार्य आहे . त्यातच मोहन रावले ह्यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर chameleon प्रमाणे शिवसेना - राष्ट्रवादी - शिवसेना असे पक्षाबद्दल केवळ काही आठवड्यांच्या कालावधीत केल्याने त्य्नाच्या समर्थकांमध्ये गोंधळ उडालेला असणे स्वाभाविकच आहे .
अरविंद सावंत - बाळा नांदगावकर  ।।  मिलिंद देवरा - मीरा सन्याल
अशी मतविभागणी होण्याची शक्यता खूपच जास्त आहे .
ह्या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो . ह्याकडे जरा अधिक पाहूया

१ . वरळी : 
विद्यमान आमदार : सचिन अहिर
पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस
ह्या मतदारसंघावर  ( अर्थातच हा माझा विधानसभा मतदारसंघ आहे ! ) दत्ताजी नलावडे ह्यांची अनेक वर्षे पकड होती . वरळी कोळीवाडा हा शिवसेनेला  कायम मदतीचा हात देणारा विभाग ह्याशिवाय वरळी नाका अन् त्यापलीकडील पूर्वेकडच्या भागातही सेना - मनसेचे प्राबल्य . परंतु नलावडे ह्यांनी घेतलेली निवृत्ती , अहिरांची प्रचंड आर्थिक क्षमता , राजकीय दादागिरी अन पवारांशी जवळीक ह्यामुळे येथे प्रचंड धुमश्चक्री प्रचारादरम्यान पाहायला मिळाली होती . ह्याशिवाय सेना - मनसे मतफ़ुटी होतीच !  येथील मते ह्या  पक्षांत विभागली जातील असा माझा अंदाज आहे . येथील
नगरसेवकांचा जनसंपर्क अफाट आहे अन् त्यामुळेच येथे त्यांचा प्रभाव अन प्रचाराची तीव्रता निर्णायक ठरेल .

२. शिवडी :
विद्यमान आमदार :बाळा नांदगावकर
पक्ष : मनसे
गेल्या वेळी येथे तेव्हाचे आमदार दगडू सकपाळ  ह्यांना  बाळा नांदगावकर ह्यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभूत केले होते . ह्यात प्रामुख्याने गिरणगावात सेना - राज ह्यांच्या झालेली मतविभागणी आणि दोन्ही उमेदवारांचा जनसंपर्क ह्या कारणांचा समावेश होता . यंदा ह्या मतविभागणीला अन् राज ह्यांच्या दिशाहीन प्रचाराला कंटाळल्याने अन मोदींच्या प्रभावामुळे महायुतीकडे मतदार  शकतो परंतु खुद्द नांदगावकरांना मिळालेले तिकीट ह्यामुळे समीकरणे पार बदलू शकतात ,


३. भायखळा 
विद्यमान आमदार :मधुकर चव्हाण
पक्ष :  कॉंग्रेस
ह्या भागात बहुदा भेंडीबाजार , भायखळा आणि इतर पूर्वकडील भागांचा समावेश होत असावा ( मला माहिती मिळाली नाही भौगोलिक दृष्ट्या माझा अंदाज बरोबर असावा ) त्यामुळेच सारी अमराठी मते देवरांना मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे .


४. मलबार हिल 
विद्यमान आमदार :मंगलप्रभात लोढा
पक्ष :भाजप
तब्बल वीस वर्षे येथे विद्यमान आमदार निवडून येत आहेत. बाबुलनाथ परिसर तसेच इतर गुजराती बहुल वस्ती , जयवंतीबेन मेहता ह्यांनी तसेच लोढांनी केलेली कामे जनसंपर्क ह्यामुळे हा भाग भाजपची हमखास विजय मिळवून देणारी जाग. त्यातच मोदिलातेमुळे सगळा गुजराती मतदार महायुतीला मत देणार हे जवळपास निश्चित ! ह्याशिवायाही येथे  आहे त्यामुळेच मनसेमुळे मतविभागणी झाली नाही तर अरविंद सावंत ह्यांना येथून चांगलीच आघाडी मिळू शकते .

५. मुंबादेवी 
विद्यमान आमदार :अमीन पटेल
पक्ष :  कॉंग्रेस
येथे देखील मलबार हिल्प्रमाणे  मतदार आणि मूळचे स्थानिक मुंबईकर ( पाठारे - प्रभू ) ( ह्यांची इथे बरीच property आहे असे ऐकिवात आहे ! ) राज पुरोहित ह्यांचा जनसंपर्क ह्यामुळे भाजपचे प्राबल्य आहे परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मनसे - शिवसेना मतविभागणीचा महायुतीला चांगलाच फटका बसला होत. यंदा ही मते पुन:च महायुतीकडे एकवटली जाऊ शकतात ( सारे काही मोदी effect वर अवलंबून )


६. कुलाबा 
विद्यमान आमदार :शेखर Annie
पक्ष : कॉंग्रेस 
ह्या मतदारसंघात कुलाबा कोळीवाडा अन नेव्हीनगर हे भाग सोडले तर बहुतांश विभाग हा गर्भश्रीमंतांच्या रहिवासाचा आहे . अन हा भाग पूर्वीपासूनच मुरली देवरांच्या परंपरागत मतदारसंघात येत असल्याने कॉंग्रेसची हक्काची मते येथे आहेत .


ह्यासगळ्यात आता 'आप' चा विचार करूया ! मीरा सन्याल ह्यांचे नाय ह्याआधीही मतदारांनी मतदानयंत्रावर पाहिले आहे . आपचा प्रभाव तसा उच्च मध्यमवर्गीय अन् श्रीमंत मतदारांवरच राहील असा अंदाज आहे ह्याचे मुख्य कारण म्हणजेच गिरणगावातील सारी मंडळी बाळासाहेबांना दैवत मानणारी आहेत . जरीही मनसेला मते दिली तरीही त्यांची सेना ( मग ती शिवसेना असो व म. नवनिर्माण !) निष्ठा ढळत नाही !
सन्याल ह्या कॉंग्रेसची मते खेचू शकतात . त्याबाबतीत देवरांना गाफील राहून चालणार नाही . वरळी सी फेस , परळ मधील उच्चभ्रू वस्ती ( ज्याला status symbol वाटावा म्हणून अप्पर वरळी म्हटले जाते जे खरे वरळी नव्हेच ! ) मलबार हिल खंबाला हिल येथील अगुजराथि मतदार , कुलाबा अन मरीन drive परिसर येथे ही आप -  कॉंग्रेस मतविभागणी देवरांना तापदायक ठरू शकते . इतर मराठी बहुल सेनानिष्ठ भागात आप केवळ तरुण मतेच मिळवू शकेल असे सकृतदर्शनी वाटत आहे .

त्यामुळेच येथे चुरशीची चौरंगी लढत पाहायला मिळणार हे निश्चित !
विजय कोणाचा होईल हे सांगणे कठीण असले तर जर आपचा ताप झाला नाही तर देवरांना कोणी हरवू शकेल असे वाटत नाही परंतु कोणत्या विभागात किती टक्के मतदान होईल अन ते कोणत्या वयोगटाचे अन धर्माचे ह्यावर सारी समीकरणे अवलंबून असतील !

पाहूया काय होते आहे ते !

I voted. Will you ?
"Use your right...Cast your vote to bring change" 
Let us build our nation.


- sam