आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २४ जुलै, २०१६

रिओ ऑलिंपिक २०१६

 The greatest show on earth असं ज्या सोहळ्याचं वर्णन केलं जातं असा क्रीडासोहळा म्हणजेच उन्हाळी ऑलिंपिक!
माझ्यासारख्या क्रीडाप्रेमींसाठी ऑलिंपिकचा काळ म्हणजे पर्वणीच. दर चार वर्षांनी जुलै महिना सुरू झाला की ऑलिंपिकचे वारे वाहू लागतात. तसंच यंदाही ५ ऑगस्टपासून ब्राझीलच्या रिओ शहरात सुरू होणाऱ्या ह्या क्रीडासोहळ्याची प्रचंड उत्सुकता आहे. आजपासून केवळ ३३ दिवस उरले आहेत.
मी खऱ्या अर्थाने ऑलिंपिक फॉलो करायला लागले २००४ मध्ये. चौथीत होते तेव्हा. वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करून जेमतेम दीड- दोन वर्ष झाली होती. मी पहिल्यापानावरुन थेट शेवटच्या पानावर जायचे आणि उलटं वाचत यायचे त्यामुळे माझा पेशन्स संपायच्या आता क्रीडा पान वाचून होत असे. तेव्हा ऑलिंपिकचा इतिहास, सहभागी देश, सोहळ्याचं नियोजन, क्रीडापटूंची तयारी ह्या सगळ्याबद्दल माहिती मिळत गेली. त्यातच राज्यवर्धन राठोडने जिंकलेलं रौप्य पदक ह्या सगळ्यामुळे मी भारावून गेले होते.
२००८ बीजिंग ऑलिंपिकच्यावेळी वेळेचा फरक जास्त नव्हता आणि घरातला TV पुन्हा सुरू झाला होता त्यामुळे रोज दुपारी शाळेतून परत आल्यावर DD sports पुढे ठाण मांडून बसत असे. अक्षरश: भारावलेले दिवस होते. एखादा TT/टेनिसचा सामना बघताना गृहपाठ उरकणं आणि रात्री सगळ्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांची पारायणं करणं. अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळाल्यानंतरची राष्ट्रगीताची चित्रफीत पाहताना डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते. फेल्प्सची सुवर्णपदकं, बोल्टचा वेग, poll vaulter येलेनाचं सुवर्णपदक, लिन डॅनचं पहिलं सुवर्णपदक हे आणि असे अनेक क्षण मनात कोरले गेले आहे.
२०१२ लंडन ऑलिंपिक सुरू झालं त्याच सुमारास मी बंगलोरला शिफ्ट झाले त्यामुळे इंटरनेट मिळेपर्यंत ऑलिंपिक सोहळा संपला होता आणि ह्याची आजही खंत आहे पण म्हणूनच अपडेट्ससाठी सतत बाबांना फोन करून फोनवरून फॉलो केलेलं हे ऑलिंपिक लक्षात राहिलं. नंतर मात्र ह्या सोहळ्यातले अनेक क्षण कित्येकदा यूट्यूबवर पुन्हा पुन्हा पाहिले आहेत/आजही पाहते.
२०१६चा महासोहळा सुरू व्हायला जेमतेम दोन आठवडे बाकी आहेत. समजायला लागल्यापासूनचं माझं चौथं ऑलिंपिक. वेळेच्या फरकामुळे लाईव्ह पाहायचं तर रात्रीचा दिवस करावा लागेल. शक्य झालं तर ते करेनच. तुमच्यापैकी बऱ्याचजणांनी आधीचे कित्येक ऑलिंपिक सोहळे दूरदर्शनवरून/प्रत्यक्षात पाहिले असतील.
खेळाचे नियम माहिती नसतानाही खेळाडूंची तयारी, संघभावना, अनेक वर्षांची मेहेनत, खिलाडूवृत्ती, कट्टर वैरी देशातल्या खेळाडूंनी एकमेकांशी साधलेला संवाद पाहताना वेगळंच आंतरिक समाधान मिळतं. खेळातला थरार, क्रीडापटूंवरचा, प्रशिक्षकांवरचा ताण, अपेक्षापूर्तीचं समाधान, जिंकल्यानंतरचा आनंद, अनपेक्षित यशापयश हे सगळं आपणही दूरदर्शनच्या माध्यमातून अनुभवत असतो.
ऑलिंपिकच्या उद्देशानुसार सारं जग एकवटतं. राजकीय-सामाजिक विषमता, हेवेदावे विसरून केवळ खेळासाठी एकत्र आलेल्या क्रीडापटूंना आणि प्रेक्षकांना १५ दिवस इतर साऱ्या कामांचा विसर पडतो ह्यातच ह्या चळवळीचं यश आहे.

रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५

ऐलमा पैलमा - . . . - Happy Birthday to you

नवरात्र आणि ऑक्टोबर महिना म्हटल्यावर मला सगळ्यात आधी आठवणारी गोष्ट म्हणजे भोंडला ! 

बरीच म्हणजे साधारण मी लहान असताना ५ - ६ वर्ष सलग आम्ही घरी भोंडला केला मग मी मोठी झाले शाळेच्या परीक्षादेखील ह्याच सुमारास यायच्या आणि मग ही एक सुंदर प्रथा आमच्या घरापुरती बंद पडली.
माझा वाढदिवस बऱ्याचदा नवरात्रीत येत असे आणि लहानपणी पाश्चात्य पध्धतीने वाढदिवस साजरे केलेले मला आवडत नसत मग भोंडल्याच्या निमित्ताने वाढदिवस साजरा व्हायचा आणि वेगळीच मज्जा यायची.
आदल्या आठवड्यात hall मध्ये सामानाची rearrangement करून भोंडल्याचा फेर धरता येईल इतकी जागा आम्ही करून ठेवायचो.

सोसायटीमधल्या सगळ्या तायांना संध्याकाळी यायचं आमंत्रण आईने दिलेलं असे. ( माझ्या वयाचं किंवा लहान तेव्हा कोणीच नव्हतं! ) सकाळीच आजी घरी यायची आणि काहीतरी माझ्या आवडीचा पदार्थ खिरापत म्हणून करून ठेवायची.

माझ्याकडे एक खेळण्यातला लाकडी हत्तीचा पुठ्ठा होता. मग त्या हत्तीला एका पाटावर ठेवून त्याभोवती एखादी ताई खडूने छोटीशी रांगोळी काढत असे. सगळे त्यांच्या आयांसकट जमले की आमचा भोंडला सुरु व्हायचा. सुरुवात अर्थातच ' ऐलमा पैलमा गणेश देवा… ' म्हणून होत असे आणि मग एक - एक गाणी म्हटली जात. आजीला बरीच गाणी पाठ होती त्यामुळे ती म्हणताना -  त्यातले विनोद , उपहास आणि मुलींच्या सासरच्या मंडळींवरच्या गंभीर टिप्पण्या समजून घेताना त्या वयात मज्जा यायची -काळ किती बदललाय हे जाणवायचे.

सगळे दमले की मग सगळ्यात महत्त्वाचा खिरापत ओळखण्याचा खेळ सुरु व्हायचा. मग अगदी चव - वास - रंग - रूप सगळे प्रश्न स्वयंपाकघरात विचारले जायचे. आई - आजी आम्हाला ओळखता येणार नाही अश्या पद्धतीची उत्तरं देत खिंड लढवायच्या. कधीतरी जी व्यक्ती ती खिरापतआणायची ती भलतेच प्रश्न विचारून / उत्तरे देऊन दिशा बदलायचा प्रयत्न करत असे. आणि सगळ्या खिरापती ओळखल्याशिवाय वाढदिवसाचा केक कोणालाच मिळत नसे त्यामुळे सगळी मजा खिरापत ओळखण्यात ! डोकं चालवायला कसली मज्जा यायची तेव्हा

पुढे एक वर्ष काहीतरी झालं म्हणून जमलं नाही आणि मग पुन्हा कधी तसं काही झालं नाही. आता बरीचशी गाणीसुद्धा विसरले आहे कधीतरी लिहून काढायला हवीत आणि online साठवायला हवीत.

वाढदिवस असेच येत गेले पुढेही येतील. उगाचच यंदाही नवरात्र सुरु असल्यामुळे ह्या जुन्या आठवणींची नोंद करून ठेवावीशी वाटली :)

अगदी लहान असताना आजी औक्षण वगरे करत असे नंतर वाढदिवस हे केवळ पेस्ट्रीज खाण्यापुरते उरले. शाळेत आम्ही coffee bite वाटायचो .  इथे IISc मध्ये आले तेव्हा आम्ही आमच्यातला पहिला वाढदिवस अगदी केक आणून  साजरा केला त्यामुळे माझे मित्र - मैत्रिणीसुद्धा माझ्या वाढदिवसाला तेच करत.तीच पद्धत पडली जणू ! पहिल्या वर्षी ठीक होतं पण नंतर लक्षात आलं formality म्हणून मित्र - मैत्रिणी येतात. ( असं आम्ही इतरांच्या वाढदिवसाला observe केलं म्हणून लक्षात आलं ! )
बऱ्याचदा माझे  खास असे दोस्त नसल्यामुळे माझा वाढदिवस गेली दोन वर्ष विसरताहेत :) . साजरा करू नका असं थेट सांगताही येत नाही अन् खोटं सतत हसता येत नाही ( म्हणून इथे नोंद करून ठेवत्ये ! )
इथून पुढे कदाचितपद्धत बदलेल किंवा साजरेपण संपेल पाहूया :)

' जे जे होईल ते ते पाहावे चित्ती असू द्यावे समाधान ।' हेच खरं !


१८ ऑक्टोबर २०१५
( सुज्ञास सांगणे न लागे ;p )

मंगळवार, १६ जून, २०१५

मैत्रीचे बंध

She was the one who I could always count on !

Himani,not just a friend !

Crazy Pravega work, Endless planning, OCD's, Perfection and implementation, Implementation coordination, Gossip walks, Lunch and dinner fun, Sunday Morning Breakfast, Night walks, Crazy schedules...
Midnight calls, panic messages, Crying spells, Random Hangout pings...
And a cherry on the the top was : 'Happy Family'

असे कितीतरी क्षण एकत्र जगलो, अनुभवले . तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. जेव्हा जेव्हा मला मदतीची गरज होती तेव्हा तेव्हा ती धावून येई मग अगदी अपरात्री एखादा मेल लिहून देणं  किंवा मधमाशी चावल्यावर हेल्थ सेंटर मध्ये मला घेऊन जाणं , pravegaच्या वेळी चिडले तर माझी समजूत घालणं असेल. प्रत्येक वेळी 'ती' माझ्यासोबत असे. कामाच्या वेळी आमची wavelength कायमच जुळत असे. She was my best colleague !
एखादी नवीन गोष्ट करत असेन तर ती देखील तितक्याच उत्साहाने प्रोत्साहन देत असे.
ती जितक्या सहजतेने एखादे काम माझ्याकडून करून घेई तितक्याच सहजतेने मी करत असलेल्या कामात आज्ञाधारकपणे मदत करीत असे.
शिकवण्याची तिची शैली खासच ! अगदी काहीच माहित नसलेल्यालाही ती खूप छान समजावून सांगते !
आमच्या priorities, आवडी-निवडी बर्यापैकी जुळतात त्यामुळेच आम्ही कायम एकत्र enjoy करू शकलो.
तिच्यापासून मी काहीच कधीच लपवू शकले नाही. खरंतर तसा प्रयत्नही कधी केला नाही !
अगदी तिला मी भेट दिली ती तयार करताना सुद्धा मला तिच्यापासून लपवून ठेवणं खूप अवघड गेलं.
अशी ही मैत्री अगदी निरपेक्ष आणि पारदर्शक ! अगदी हेवा वाटावा अशी :)
आता अखेर जवळ येत आहे ह्याची जाणीव दोघींनाही आहे.
मैत्री कदाचित तुटणार नाही खरंतर आम्ही ती टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करूच पण आता ते रोज सकाळी एकमेकींना ब्रेकफास्टसाठी उठवणं नसेल किंवा रात्री जेवताना दिवसभराच्या गप्पा !
जगातला कुठलाच विषय व्यर्ज्य नसलेली सकस चर्चा नसेल !
केवळ hangouts च्या profile picture द्वारे आम्ही एकमेकींना भेटू.
पुन्हा आमची भेट होईल की नाही सांगता येणार नाही पण ह्या तीन वर्षांच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवीन हे नक्की !
तिच्याबद्दल लिहू तितकं थोडं आहे !
एक अत्युत्कृष्ट विद्यार्थिनी , अप्रतिम नृत्यांगना आणि लेखिका !
माझी खूपच लाडकी senior !
I am going to miss her a lot !
She has helped me change my perspective towards life !
She has supported me always in all difficult times !
She has lived up to all the definitions of "Friend'
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजचा दिवस असाच एक नोंद करून ठेवण्यासारखा !
सकाळीच तिला मी तिच्यासाठी तयार केलेल्या भेटी दिल्या.
खूपच आवडल्या असं म्हणाली लगेच.
एका डोळ्यात अश्रू अन् दुसऱ्यात हसू !
घट्ट मिठी मारून रडली ती खूप
संध्याकाळी treat दिली तिने.
खूप गप्पा मारल्या आणि पोटभर जेवलो.
अनेक आठवणींची साठवण आम्हाला आयुष्यभर साथ देईल.
आजवर असं इतकं कोणाबद्दल कधीच वाटलं नव्हतं
आत्ताही लिहिताना डोळ्यात काहीतरी दाटून येतंय
ती एका उत्कृष्ट ठिकाणी पुढील शिक्षणासाठी जात आहे ह्याचा आनंद
पुन्हा भेटू किंवा नाही ह्याचं दु:ख
laptop screen धुसर होतोय अन् तिच्यासाठी एव्हडंच म्हणावस वाटतंय …
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Himani,

All the best for your future. You are an amazing person.
Thanks for being there.
Stay in touch.

Lots of love,

- Little (Troublesome) Monkey

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

- संपदा
  १५ जून २०१६ 


( तळटीप : फोटोमध्ये कात्र्या ह्या mission accomplished ready to cut down किंवा pravega चा V अश्या अर्थाने आहेत ! )

शनिवार, ६ जून, २०१५

पुस्तके : एक भेट

माझ्या शाळेत दरवर्षी बक्षिसे म्हणून पुस्तकांसाठी ठराविक रकमेची कुपने दिली जात. मग आई त्यात आणखीन भर घालून एखादे चांगले पुस्तक विकत घेई. पुढे पुढे शाळेने पुस्तकेच बक्षीस म्हणून देणं सुरु केलं. लहान असल्यापासूनच घरात खेळणी आणि कपड्यांच्या एकत्र संख्येपेक्षा जास्त पुस्तके घरात असलेली मी पाहिली आहेत. त्यामुळेच एखाद्याला भेट द्यायची तर ती पुस्तकांचीच असंच माझं कायम मत होतं नुकताच ह्या गृहितकाला मोठा धक्का बसला.

माझी एक सीनिअर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या संस्थेत जाणार असल्याने तिला काहीतरी पुस्तक भेट द्यावे असे मनात होते. नुकताच मी एका पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला. मला प्रचंड आवडलेलं हे पुस्तक एका महिला शास्त्रज्ञाबद्दल असल्याने त्याचा इंग्रजी अनुवाद (मूळ फ्रेंच आहे ) तिला भेट म्हणून द्यावा असं माझ्या मनात होतं.

आम्ही सगळेच soft copy वर जगणारी मंडळी त्यामुळे ह्या पुस्तकाची soft copy असेल असं वाटतंच होतं आणि मला ते नको होतं. मला बऱ्याचश्या अनधिकृत वेबसाईट्सवर काही ते सापडलं नाही म्हणून मी आनंदाने ते amazon वरून kindle copy स्वरूपात भेट कसे द्यायचे ह्यावर साधारण एक तासभर शोध घेतला , तिची kindle copy चालेल ना वगैरे विचारून परवानगी घेतली आणि किंमत शुक्ती करण्याआधी पुन्हा एकदा soft copy चे अस्तित्व चेक करायला गेले आणि …….
.
.
.
.

जे मला ३ तास खर्च करून सापडले नव्हते ते अर्ध्या तासात मिळाले.

माझी शंका खरी ठरली म्हणून आनंद मानायचा की हल्ली soft कॉपीज मुळे पुस्तके भेट म्हणून देता येत नाहीत ह्याचे दु:ख व्यक्त करायचे ??

( खरंतर soft कॉपीज वापरून प्रताधिकार कायद्याचा भंग होणं आणि लेखकाला रॉयल्टी न मिळणं असे अनेक गंभीर मुद्दे असले तरी त्याबाबत पुन्हा कधीतरी . सध्यातरी पुस्तक भेट देत येणार नाही याचं दु:खच जास्त ! )

मंगळवार, ५ मे, २०१५

आता निरोप हा घ्यावा …

वाटलं नव्हतं कधी
इतक्या लवकर हा दिवस उजाडेल
कटू सत्याला सामोरे जात
भावनांना बांध घालावा लागेल

आत्ताच झाली होती भेट जणू
counselling नुकतेच संपलेले
१ ऑगस्टच्या त्या दिवशी
orientation मध्ये भेटलेले

महिन्याभरातच सुरु झाली
फेस्ट प्रवेगाची तयारी
नव्या ओळखी नवे विषय
यशस्वी करण्या एक विज्ञान वारी

बघता बघता दिवस लोटले
तयार झाली core कमिटी
सिनिअर जुनिअर झालो सारे एक
भिंत केव्हाच पडली होती

कामांचे डोंगर उपसताना
मैत्रीची मुळे खोलवर रुजत गेली
तयार झाले एक कुटुंब
नाव त्याचे एकच : IISc UG

त्यांना नव्हते कधीच कुणी
पुढे  दाखवायला मार्ग
पण स्वतः खोदलेल्या रस्त्यावर
आमच्यासाठी ते झाले दीपस्तंभ
UG Batch 2015 and 2016
This is what we share !
This is how we were !
Will miss you lots
my Dear seniors !

कुठचीही अडचण येवो
केवळ एक फोन करावा
किंवा एका हाकेवर
जवळचा senior धावून यावा

कित्ती मज्जा कित्ती मस्ती
treats आणि ट्रिप्स
quarks , pravega scipher
सदैव तत्पर UG team

 सुख दु:खे विनोद चिडचिड
यश - अपयश अन् gosips
काय केलं नाही आम्ही एकत्र ?
खरंचअसे काही आठवतही नाही

अखेर उजाडला  तो
एप्रिल ३० चा दिवस
खूप पुढे निघून गेले
आमचे सगळे seniors

कोणी इथे तर कोणी तिथे
प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या
होईल का कधी पुन्हा
अशी एकत्र भेट ?

कटू सत्य असे हे
आता स्वीकारायला हवे खरे
पण झुलत आठवांच्या हिंदोळ्यावर
नयनांतून अश्रू ओघळे

दाटून येई कंठ
काही सुचेना आता
परि पुन:श्च भेटण्याच्या आशेवर
आता निरोप हा घ्यावा
आता निरोप हा घ्यावा
आता निरोप हा घ्यावा … 





- Sampada
( Your Little Monkey / Sammy / Sampo / Sam )


गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

दीपावली : एक मुक्त चिंतन

शुभ दीपावली आणि नववर्षाच्या शुभेच्छा !

असाच थोडा विचार करत बसले होते अन् विचारांची मुक्त उधळण सुरु झाली मनात . थोडीशी विस्कळीत थोडीशी आठवणीनी ओथंबलेली . आणि मग उतरवली अनुदिनीवरल्या ह्या कागदावर … 

दिवाळी दिवाळी म्हणजे नेमकं काय ?

सध्यापुरता विचार केला तर गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून माझ्यासाठी हा एक सुटी असलेला दिवस ह्याशिवाय तरी काही वेगळे महत्व नाही या दिवसाचं !

आजोबा असताना मी शाळेत असल्यामुळे मोठी सुटी मिळे आणि पूर्ण दोन आठवडे ठाण्याला जाऊन राहता येई .आजी आणि दोन्ही दादांबरोबर रांगोळी काढणे,  किल्ले बघायला जाणे अन भर दुपारी उन्हात मनसोक्त खेळणे असे ते सुंदर दिवस होते . याहीपेक्षा आजोबांसोबत दिवाळीच्या सुटीतला अभ्यास करायला मिळायचा. खूप मजा यायची या सुटीच्या दिवसांत . कितीतरी नवीन पद्धती , गणितातील गमती - जमती , लिखाणाचा सराव , मुद्रितशोधानात त्यांना केलेली मदत अन् दिवाळीच्या वहीसाठी लढवलेली कल्पकता हीच खरी  दिवाळी असायची माझ्यासाठी.केवढा शिकायला मिळलय तेव्हा आजोबांकडून ! दिवाळीची वही सजवताना , अगदी एक साधा कागद वहीत कमीत कमी गोंद वापरून कसा नीट चिकटवायचा इथपासून ते अगदी डोळ्यासमोर उभे राहील असे प्रवासवर्णन सोप्या शब्दात कसे लिहायचे किवा पत्र कसे लिहायचे हे सारे नकळत शिकायला मिळाले आजोबांकडून ह्या जेमतेम ५-६ दिवाळीच्या सुट्यांमध्ये . अशाच बहुदा त्यांच्या शेवटच्या दिवाळीत आयडियलकडे मागवून घेतलेली अन मला काही पूर्वकल्पना न देता माधुरी पुरंदरे ह्यांची "वाचू आनंदे " हे पुस्तकांची मालिका  वाढदिवस आणि दिवाळी भेट म्हणून त्यांनी घेतली होती . ती आजवरची मला मिळालेली सगळ्यात मौल्यवान अन खूप काही शिकवुन गेलेली अशी विशेष दिवाळी भेट ठरली. 
नावापुरते आणि आमची हौस भागवायला २-४ अनार ,  एखादे भुईचक्र आणि फुलबाज्यांचा एक खोका हे आणि एव्हढेच फटाके घाबरत घाबरत आई - बाबा , आजी - आजोबा,  मावशी - काका आणि दोन्ही दादांसोबत अंगणात फोडायचो . कसं कोण जाणे पण फटक्यांमुळे प्रदूषण होते इ  गोष्टी मला त्या लहान वयातही समजत होत्या . केपा आणि त्यांच्या बंदुका घेऊन मात्र आम्ही बरेच दिवस वेगवेगळे चोर शिपाई आणि इतर मारामारीचे खेळ वाडाभर उंडारत खेळत असू . आजोबा गेले अन् त्यावर्षी फटाके आणण्याचे थांबवले ते थांबवलेच . नंतरही कधीतरी आईने एकदोन फुलबाज्या आणल्या होत्या ; पण ती मजा नसल्यामुळे इच्छाच झाली नाही फटके फोडायची . पणत्या आणून त्या रंगवणे हाही एक उपक्रम मात्र नंतर बरेच वर्ष मी केल्याचं मला चांगलंच आठवतंय . 

आजोबा गेल्यावरही आजीसोबत ह्यातल्या बऱ्याच गोष्टी दर दिवाळीच्या सुटीत होत असत पण ती मजा पुन्हा कधीच आली नाही . नंतर नंतर अभ्यास वाढत गेला अन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यात ही सुटी संपू लागली पण त्यात एक वेगळी मजा  होती ज्ञान मिळवण्याची अन यश संपादन करण्याची .
पण ह्या साऱ्यात एक अत्यंत समान धागा होता ज्यात माझा बराचसा वेळ व्यतीत होई  तो म्हणजे "दिवाळी अंक " किमान दहा अंकांचे वाचन झाल्याशिवाय समाधानच होत नसे. मग ते अगदी चंपक किशोर पासून ते मोठ्यांच्या मासिकातील त्या वयात वाचण्याजोग्या कथा अन मुलाखती असोत . पुढे पुढे गाडी चांदोबा वगैरेंवरून एकदम पत्रिका , छात्र प्रबोधन यांवर येउन थांबली. पण ह्या अंकांनी जणू व्यक्तिमत्व घडणीत फार मोठा मोलाचा वाटा  उचलला . समाज म्हणजे काय ह्याचे भान हळूहळू ह्यातून येत गेले. माणसांच्या चित्रविचित्र स्वभावाचे निदान theoretically ज्ञान होत गेले .दिवाळी अंकांची चाहूल मला पार कोजागिरी पासून लागत असे. कोणताही अंक माझ्याशिवाय कोणी उघडायचा नाही ह्या एका कारणावरूनच काय तो हट्ट - चिडचिड आणि रडणं होत असे. दिवाळी म्हणजे दिवाळी अंक हे जवळ जवळ bijective Function जणू ! 

हळू हळू मोठी होत गेले तसा आता वर्षभर खात असलेल्या चिवडा - लाडू चकलीचे दिवाळीपुरते पूर्वी असलेले महत्व कमी झाल्याने, घरातल्या अनेक मधुमेहींमुळे एकूणच गोड मिठाई आणि इतर पदार्थ खाण्यातला कमी झालेला उत्साह , वर्षानुवर्षे पाहिलेली दादरची खरेदीची गर्दी आणि आधीच गरज भागेल इतके असलेले कपडे ह्यांमुळे नवीन कपडे वगरे बद्दल असलेली अनास्था , कुटुंबीयांनी एकत्रित भेटण्यासाठी नसलेला वेळ आणि मुंबईत होणाऱ्या प्रचंड प्रदूषणामुळे होणारी चिडचिड … एकूणच ह्या अनेक घटकांमुळेच दीपावली साजरी करण्यात फोलपणा आहे असेच काहीसे वाटू लागले . घरी तसेही कोणत्याच सणाचे प्रस्थ - पूजा - अर्चांचे अवडंबर नव्हतेच . कदाचित त्यामुळेच मी मनातून ह्या  दिखाऊ साजऱ्या उत्सवापासून कायमच दूर दूर जात राहिले .

गेली तीन वर्षे मात्र इथे वेगळ्याच विश्वात असल्याने दिवाळीचातसा विशेष गंधही नाहीये. नवीन कपडे घालणे अन केवळ आपली संस्कृती , पूजा - अर्चा … अशा दृष्टीकोनातून मी कोणत्याच सणाकडे अन विशेषत: दिवाळीकडे आजतागायत पहिले नसल्यामुळेच  असेल कदाचित पण राहिलेला अभ्यास संपवण्यासाठी मिळालेली एक बोनस सुटी अशी माझी मानसिकता झालीये . फारतर आंतरजालावर प्रसिद्ध होणारऱ्या दिवाळी अंकाचे वाचन एवढाच माझा काय तो दिवाळीशी संबंध . 
आम्ही सगळीच भावंडं वेगवेगळ्या शहरांत आणि आपापल्या कामात व्यग्र आहोत . आणि . . आता आजीही नाही :( आम्हाला सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवणारा हा महत्वाचा दुवाच निखळलाय. यंदापासून तिची दरवर्षी होणारी भाऊबीजही आता ह्यापुढे नसेल . माझी दृष्ट काढायला ते सुरकुतलेले मऊ हात नसतील अन् मुख्य म्हणजे मी पुढच्या सुटीत घरी जाईपर्यंत माझ्यासाठी खुणा करून ठेवलेल्या दिवाळी अंकातले लेख नसतील . छात्र प्रबोधनच्या अंकाला कुणीच स्पर्श केलेला नसेल . आई - बाबा देखील बहुदा कार्यालयातून मिळालेली ही सुटी इतर कामे करण्यासाठीच वापरत असतील.

खरंतर सगळी मजाच जणू निघून गेलीये आता दिवाळीतली. इथे सगळ्या मैत्रिणी sweets , new dresses , पूजा , lamps अश्या चर्चा करत असताना त्यात सहभागी व्हायची अजिबात इच्छा नाहीये . त्यात एकाच समाधान म्हणजे आज एक नवीन दिवाळी अंक वाचायला मिळाला . अक्षरश : झपाट्याने वाचून काढला अन् वाटले हीच माझी यंदाची दीपावली . 


गेले ते दिन गेले म्हणत त्या जुन्या आठवणीत रमायचे अन् पुढील अभ्यासासाठी सज्ज व्हायचे यासाठी घेतलेला एक थांबाच जणू …

- Sam

ऑक्टोबर २३ , २०१४
लक्ष्मीपूजन

रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

पूर्णविराम : एका वेगळ्या प्रवासाला

१४ सप्टेंबर २०१३
अचानक संध्याकाळी एक धक्का बसला . एक जबाबदारी अंगावर पडली !  हे सगळा इतकं अनपेक्षित होतं की तेव्हा कसलाच विचार केला नव्हता . डोक्यात विचारचक्रे सुरु झाली होती पण ; पुढे काय होणार आहे हे तेव्हा कळणार तरी कसे होते ! त्या वेळी  आधीच इतक्या गोष्टीत मी गुंतलेले होते की एक चेंलेंज स्वीकारावं तसा काहीसं डोक्यात नोंदले गेले ते क्षण ! 



१४ सप्टेंबर २०१४
 खरंतर ज्या क्षणी मी हे उतरवत आहे त्याच सुमारास हे घडलं . आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालंय .

सुरुवातीला वाटणारी नसती कटकट नंतर खरंच आनंद देऊन गेली . कधी चेंलेंज म्हणून तर कधी मजा म्हणून जे जे जमेल ते करत गेले .
सगळ्यांपेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असूनसुद्धा माझ्यावर कोणीतरी विश्वास टाकला होता माझ्यापरीने मी तो सार्थ ठरवलाय. भल्यासाठी  जितकं जमेल तितकं केलंय . चुका माफ नक्कीच होतील

अनेकांना सोबत घेऊन काहीतरी यशस्वी करणं हे सोपं नसतं  विशेषत : मुलींना , ह्याची जाणीव ह्या प्रवासात झाली .
अनेक हात सोबतीला  पण तोंडं चार दिशांना अश्या परिस्थितीत खंबीरपणे मार्ग कसा काढायचा हेही ह्यानिमित्ताने उमगलं. प्रवाहाविरुद्ध पोहताना अनेक अडचणी असल्या तरीही त्यात एक वेगळी मजाही असते हे समजलंय .
कधी चुकले , कुठे अडखळले. कधी एकटीनेच मार्ग काढला तर कधी कोणाच्या सोबतीने . मार्गदर्शन करायला अनेकांची साथ अन् भरभक्कम पाठींबा वेळोवेळी होताच . त्याशिवाय हे निभावणं शक्यही झालं नसतं .

 एका जबाबदारीतून मुक्त झाले . दिवस - रात्र एक करून , जेवण विसरून करावे लागणारे कामही नसेल . उरल्यात त्या फक्त गेल्या वर्षभरातल्या  कडू - गोड आठवणी . निरोपाचे दु:ख निश्चितच नाही . पण जोडला  गेलेला  मित्रपरिवार  दुरावेल ह्याचे वाईट नक्कीच वाटतंय .

अशी हि अनुभवांची शिदोरी घेऊन आता पुढे वाटचाल करणार आहे .

अगदी मुक्तपणे .. . .

- संपदा



रविवार, १० ऑगस्ट, २०१४

३ राख्यांची गंमत

आज रक्षाबंधन !
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत नियमितपणे साजरा केला जाणारा एक सण !

आषाढीनंतर शाळेला असणारी बहुदा पहिलीच सुटी ,खरंतर या सणापासून जे सुट्यांचे सत्र सुरु होई ते बहुदा दिवाळीनंतरच संपत असे म्हणून खासच अप्रूप होते मला ह्या सणाचे !
केवळ बहिणीनेच भावाला राखी बांधायची हे काही मला कधीच पटले नाही. माझ्या आवडीच्या राख्या घ्यायच्या / तयार करायच्या आणि त्या बांधणार मात्र माझे दोन बंधुराज ही संकल्पनाच मला सहन होत नसे अन् म्हणूनच मी नेहेमीच ३ राख्या घेत असे . दोन दादांना बांधत असे अन शेवटची एक त्यांच्याकडून बांधून घेई ! अगदी दुसऱ्या दिवशी  शाळेत जाताना देखील बऱ्याचदा मी ती राखी काढत नसे .
गेली काही वर्षे आम्ही तिघे तीन वेगवेगळ्या शहरात राहत आहोत त्यामुळे प्रत्यक्ष रक्षाबंधन काही होत नाही . केवळ मेलद्वारे राखीची इमेज पाठवली आज अन मग अचानक तीन राख्यांची गंमत आठवली आणि मेल पाठवताना स्वत:लाच CC करायला हवा होता का असा विचार करत बसले  :D



- Sam

( राखी आंतरजालावरून साभार )

शनिवार, ७ जून, २०१४

आठवणीच्या चिंध्या


काल दुकानात प्रिंटआउट काढण्यासाठी गेले होते . तेव्हा माझ्या  job च्या कागदांच्या ह्या चिंध्या दिसल्या अन् जूने दिवस आठवले ! तिथल्या मुलाने हा सारा कचरा फेकून द्यायच्या आत मी जवळजवळ तिथून हिसकावून घेतला आणि माझ्या पिशवीत कोंबला . माझा सहकारी माझ्याकडे बघतच राहिला पण त्याला काहीच कळणार नव्हते माझ्या मनात त्या क्षणी काय चालू होते ते !


माझे मन जवळजवळ १५ वर्षे मागे गेले . म्हणजेच मी तेव्हा साधारण ३ - ४ वर्षांची असेन. बाबांच्या ऑफिसात जायचं ह्याचं खूपच अप्रूप असे तेव्हा . दरवर्षीचा दसरा  वगळता एखादी वारी होई माझी तेथे . पण तिथे गेल्यावर अश्याच कागदाच्या चिंध्यांचा डोंगर दिसत असे . त्यावर जाऊन उड्या मारणे , त्यातल्या वेगवेगळ्या आकाराच्या चिंध्यांचे मासे तयार करणे आणि अनेक चिंध्या सोबत घरी घेऊन येणे हे माझे आवडते उद्योग !
बाईंडर काका देखील अगदी प्रेमाने मला हे सारे करू देत . कधी कधी मग प्रिंटर काका मला एखाद्या कागदांच्या उंच गठ्ठ्यावर बसवत . मग सगळ्या प्रेस मध्ये काय चाललं आहे हे तिथून मला दिसे . त्या छपाई यंत्राचा तो एका लयीतला कागद उचलताना होणारा आवाज आणि मग हळूच सरकत जाऊन शुभ्र अंगावर रंगीत नक्षी लेवून खाली पडणारा तो कागद ! खूपच अचंबा वाटायचा मला साऱ्याचा . मशीनही अजस्त्र वाटत असे . दसऱ्याच्या दिवशी सजलेली यंत्रे अन् हत्यारे , रंगाचे डबे , cutting machine त्याच्या वेगवेगळ्या blades ह्याची सारे कामगार अगदी मनोभावे पूजा करत . त्या दिवशी साधा कागदाचा तुकडाही पवित्र वाटत असे !

पुढे जशी वर्षे गेली तसा प्रेससुद्धा घराजवळ आला अन मग मी बऱ्याचदा इंटरनेट साठी किंवा सहजच तिथे जात असे. आर कधी यंत्र चालू नसेल तर ती शांतताही त्रासदायक वाटत असे इतका त्या यंत्राचा आवाज परिचित आणि आपलासा वाटत असे मला !

हळूहळू बाबांचे बोलणे ऐकून मीदेखील हे यंत्र कसा चालतं हे समजू लागले होते . ढगाळ वातावरणात कागदावर चुण पडू नये म्हणून छपाई करत नाहीत , दोर्याने शिवलेली पुस्तके गमिंग केलेल्या पुस्तकांपेक्षा अधिक काळ टिकतात , कागद हळुवार उचलावा अन्यथा त्याच्या कडांनी हाताला चिरा जातात , कागद कापताना खाली पुठ्ठा ठेवावा असे अर्धवट ज्ञान मलाही झाले ! गमिंग आणि पेस्टिंग कसा करतात , एखाद्या वस्तूला / वही - पुस्तकाला व्यवस्थित कव्हर कसे घालावे हे जणू तज्ञ व्यक्तीकडून शिकायला मिळाले . अगदी साधी छपाई करताना देखील कागद कसा वाचवावा ह्याचेही बाळकडू मला मिळाले . ह्या सगळ्या गोष्टी शिकताना एक मात्र झाले खूपच मोठ्या प्रमाणात सतत कागद बघितल्याने कदाचित मी त्याच्या काटकसरी वापराबाबत प्रचंड बेफिकीर झाले आहे .

हे सारे असले तरीही मला नेहेमी वाटत असे की ह्या सार्या informal शिक्षणाचा मला उपयोग तो काय ! पण गेल्या साधारण वर्षभरात ह्या माझ्या गृहितकाला धक्काच बसला . pravega साठीचे प्रिंटींग जास्तीत जास्त चांगले करताना , scipher साठीचे packing करताना, कागद भरभर कापताना किंवा अनेक गठ्ठे उचलून नेताना , बक्षिसे wrap करताना जेव्हा मी भरभर ही  कामे इतरांपेक्षा दुप्पट वेगाने अक्षरश: उरकते तेव्हा मला जाणवतं की केवळ आणि केवळ बाबा अन् graphitec मुळेच आणि बाबांकडून मिळालेल्या अनौपचारिक ज्ञानामुळे हे मला जमू शकतंय . ह्या साऱ्याबद्दल मी कायमच त्यांची आभारी असेन .

खरंतर छपाई केवळ माझे बाबाच नाहीत तर आई अन् आजीने देखील ( indirectly आजोबा सुद्धा ) एक उद्योग - धंदा म्हणून कोणत्या न कोणत्या प्रकारे अन् त्यांच्या जीवनात एकदातरी केली आहे . म्हणूनच मी ह्या क्षेत्राशी सध्या थेट संबंधित नसले तरीही मलाही आयुष्यात कधी न कधी छपाई संदर्भात काहीतरी करायला नक्कीच आवडेल .

कित्येक वर्षे झाली सतत धावणाऱ्या त्या यंत्राचा आवाज शेवटचा ऐकून !
रंगांच्या डब्याचा अन् केरोसिनचा तो सुवास आजही मनात दरवळतो आहे .
रोलर पुसण्यासाठी लागणाऱ्या कापडाच्या चिंध्या माझ्या खोलीत आपण कधीतरी वापरले जाऊ म्हणून आजही वाट बघत आहेत !
कागद / चित्रे कापून चिकटवताना मागे उरणाऱ्या चिंध्या कचऱ्यात जाण्याआधी टेबलावर अनेक दिवस रेंगाळणे नेहेमीचेच आहे .
काल मला मिळालेला हा चिंध्यांचा गुंता अनेक दिवस माझ्याकडेच मुक्काम करणार आहे . ह्या जुन्या रम्य विश्वाची सफर सतत घडवून आणणार आहे
परंतु
 आता  ह्या आठवणीच्या चिंध्या पुन्हा जोडून एकसंध चित्र तयार करून त्या दुनियेत प्रत्यक्षात जाता येणार नाही हे सत्य अस्वस्थ करत राहणार आहे .

 - Sam

शनिवार, २१ डिसेंबर, २०१३

बालमोहन ...

आता " बाळांनो ,।" अशी प्रेमळ हाक मारणारे कोणी नसेल !
बालदिन अन वार्षिक बक्षीस समारंभाची ती शान नसेल .
इंग्रजीत अस्खलित  संभाषण केल्यावर पाठीवर पडणारी थाप नसेल .
अन सुयश संपादन केल्यावर कौतूकासाठीचा फोन नसेल ।

बालमोहनचा एक आधारवड आता उन्मळून पडलाय …
शाळा हि कधी शाळा वाटलीच नाही मला दुसरे घरच होते ते !
कोणत्याही स्पर्धेला जाताना तुमचे आशीर्वाद आत्मविश्वास वाढवायचे .
यश मिळाल्यावर होणारे कौतुक पाहून  आनंदाश्रू वाहू लागायचे
शाळेसाठी थोडेफार जे करता आले त्याचे समाधान आहेच . काही गोष्टी राहून गेल्या खऱ्या पण शाळेने केलेले संस्कार , लावलेले वळण अन समाजात वावरण्यासाठी उपयुक्त असे ' जगण्याचे ' धडे हि पुंजी अशीच मनात जपून ठेवली जाईल.


Inline image 1


शाळेचे नाव असेच उज्ज्वल करून बालमोहनची पताका अशीच फडकवत ठेवणे हीच खरी आदरांजली ठरेल अन 'बालमोहन'चे  एक बाळ म्हणून मी यासाठी नेहेमीच कटीबद्ध राहीन .
- एक बाळ
  संपदा
  बालमोहन विद्यामंदीर १९९८ - २०१०

  २५/११/२०१२

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

ती गेली तेव्हा …

एक वेगळेच रसायन होते ते ! आजोबांना सतत काम करता यावे म्हणून घराची जबाबदारी  समर्थपणे उचलणारी , मला बरं नसेल तर सारे काम सोडून ठाण्याहून  वरळीला धावत येणारी , रोज छोट्या शाळेत न्यायला येणारी अन् माझे खाण्यापिण्याचे अगणित चोचले पुरवणारी , शेवटच्या काही वर्षांत कायम घरी असल्यामुळे घराला खरं खुरं घरपण आणणारी अशी….  ती "माझी आजी !'

आता रात्री उशिरा घरी गेल्यावर खास माझी वाट बघत जागं असलेलं आपलं माणूस नसेल… 
वेळी - अवेळी भूक लागली तरी प्रेमाने काहीतरी खायला करून देईल असं हक्काचं कोणी नसेल…. 
वेगवेगळ्या वर्तमानपत्रातले लेख खास माझ्यासाठी बाजूला काढून मला वाचायला देणारं अन त्यावर चर्चा करणार असं माझं कोणी नसेल .…
प्रिय आजी ,
               आज तो दिवस आलाच ; पण त्यामुळेच मला भूतकाळात एक फेरफटका मारायची संधी मिळाली :( 
आई - बाबा सकाळी लवकर ऑफिसमध्ये गेल्यावर  गेली जवळपास १७ वर्ष आपणच असायचो सोबत. नेहेमीच. 
जसजशी मी मोठी होत गेले तसं त्याचा स्वरूप बदलत गेलं . अगदी लहान असताना बाबा दादरला सोडायला यायचे तेव्हा तू आंघोळीला गेलेली असलीस आणि आजोबा घरी  असले तरी मी नेहेमीच तू परत येईपर्यंत बाबांना थांबवून ठेवत असे ,  नाही का गं ?
त्या खिडकीखालच्या फळीवर तू भिजत ठेवलेल्या मनुका अन बदाम  खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात होत असे. मग चाळभर भटकण्यात अन् आजोबांनी दिलेले 'वीस'  प्रश्न सोडवण्यात सकाळ निघून जाई .
दुपारी जेवल्यावर केवळ तुला पडायचं असल्याने मग मला झोपवण्याचा प्रयत्न तू नेहेमीच केलास . दुर्दैवाने यात यश कधीच आले नाही . त्यानंतर मग गोष्टी ,  लेख . बातम्या अन् कविता वाचनाचा कार्यक्रम होई अन् मग उनाडक्या करायला मी मोकळी असे . आई न्यायला आल्यावर पटकन तिच्याबरोबर मी निघाल्ये असे कधी झाले नाही कारण तुला सोडून घरी जायचं ही  कल्पना मला तेव्हादेखील सहन होत नसे.
थोडी मोठी झाले अन् छोट्या शाळेत जाऊ लागले. अगदी दररोज न चुकता वेळेआधीच तू मला न्यायला हजर असायचीस . मग चालत परत येताना रानडे रोडवर धमाल करणं असो किंवा तिथल्या गजरेवाल्याच्या दुकानाबाहेर उभं राहून मांजरी मोजणं असो , उन्हाळा जवळ आला की ताडगोळे सोलून घेणं असो अश्या कित्येक गोष्टी जणू अगदी कालच  घडल्यासारख्या !
पुढे माझी शाळेची वेळ बदलली अन् तुम्ही दोघे ठाण्याला राहायला गेलात . खरंच रोज आठवण यायची तुम्हा दोघांची ; पण मग ती कसर दोन्ही सुट्यांमध्ये भरून काढायचो आम्ही तिघेही तुझी लाडकी नातवंड .
ह्या अनेक सुट्यांमध्ये मी स्वावलंबन शिकले आणि बरेच काही . अगदी अंगण साफ करण्यापासून ते भाडेकरूंच्या पावत्या लिहिण्यापर्यंत सगळी कामे केली . खूपच मजा यायची तेव्हा .
नंतर नंतर आजारपणामुळे तू वरळीला राहायला आलीस आणि मग  गेली आठवर्षे आपण कायमच एकत्रच होतो. तू असल्यामुळे मला कधीच एकटं राहावं लागलं नाही . तुझ्यासोबत पाठ केलेल्या कविता , सुभाषिते , श्लोक , तू घेतलेला इंग्रजीचा अभ्यास आणि बरंच काही .
मी स्पर्धात्मक चेस खेळायचे ह्याचा तुला कोण अभिमान  होता . माझ्याबरोबर दिवसदिवस वेगवेगळ्या स्पर्धांच्य ठिकाणी तू सोबत म्हणून यायचीस . तिथल्या राजकारणाशी तोंड देताना माझ्यावर पूर्ण विश्वास ठेऊन पूर्ण पाठींबा द्यायचीस हे कधीच विसरू शकणार नाही मी . मी इथे बंगलोरला आले तेव्हा मला सगळ्यात जास्त तुझीच काळजी होती कारण …… दिवसभर तुझ्यासोबत कोणीच असणार नव्हत पण तू खंबीरपणे ते एकटेपण स्वीकारलस . शेवटचे तीन महिने खरंच  खूप त्रासदायक होते पण त्यातूनही बाहेर पडण्याच्या तुझ्या दुर्दम्य इच्छाशक्तीला खरंच दाद द्यावी लागेल .

तू हा डाव अर्ध्यावर सोडून गेलीस असा नाही म्हणणार मी पण तो पूर्णही नाही केलास .
आज दोन्ही दादांची शिक्षणं पूर्ण झालीयेत दोघेही कमावते झाल्येत मला माहितेय माझ शिक्षण पूर्ण झालेला तुला बघायच होतं . ते समाधान तुझ्या चेहेऱ्यावर बघणं अन तुझा हात मायेने पाठीवरून फिरणं हे मला पुढचा यश मिळवण्यासाठी नेहेमीच स्फूर्तीदायी होतं अन तू नसलीस तरी यापुढेही असेल . आजही मला आठवतंय,  माझा स्कॉलराशिपचा निकाल लागल्यावर तुला झालेला आनंद पाहून जग जिंकल्यासारखा वाटला होता मला !
तू केलेले संस्कार , तुझी शिकवण अन रोजच्या आयुष्यासाठी लावलेल्या काही चांगल्या सवयी ह्याद्वारे तू नेहेमीच माझ्या सोबत असशील .
यापुढेही जे काही मिळवेन ते तुला नेहेमीच आनद देईल
तू जर असशील जिथे असशील तिथून नेहेमीच मला आशीर्वाद देशील अन प्रेमाचा वर्षाव करत राहशील ह्यात शंकाच नाही .
राहून राहून एकच खंत वाटली म्हणजे मी शेवटच्या क्षणी तुझ्यासोबत नव्हते पण तू पाच दिवसांपूर्वी सांगितलेले शब्द अजूनही मला ऐकू येत आहेत " संपदा ,अभ्यास सोडून केवळ मला भेटायला येऊ नकोस !!"
खरंच आजोबाच्या आणि तुझ्या शिकवणीप्रमाणे हे दु:ख बाजूला सारून अभ्यासाकडे लक्ष देणं अन् खूप शिकणं हीच बहुदा तुला खरी श्रद्धांजली ठरेल .
bye bye
तुझीच लाडकी,
- संप्या
  १९/११/२०१३
  बंगलोर