गुरुवार, १९ मार्च, २०१५

काहीच्या काही . . उगाचच (१)

 एक होता बैल . वर्षातले आठ महिने घाण्याला जुंपलेला …
त्याचे काम एकच …
झोपेच्या खोबऱ्यातून assignments ची उत्तरे काढणे …


शनिवार, २४ जानेवारी, २०१५

Humanities UH 302 : शासनाची ओळख

नव्या वर्षासोबतच नवे सेमिस्टर सुरु झाले. नवे कोर्सेस , वेगळे विषय , नवे वेळापत्रक ह्या सगळ्याशी जुळवून घेतानाच  जवळ जवळ ९- १० महिने ज्याची अत्यंत आतुरतेने वाट बघितली होती तो म्हणजेच आमचा शेवटचा humanities चा कोर्स सुरु झाला . अगदी course format वाचला तेव्हाच खात्री पटली होती आणि पहिल्या लेक्चर मध्ये बऱ्याच अपेक्षांची पूर्ती होईल असे संकेत मिळाले . अगदी वेगळा अनुभव , अनेकविध विषय अन् तेही आपल्या रोजच्या वाचनातले ! त्यामुळेच वेगवेगळ्या लेक्चर्स मध्ये मिळालेली माहिती , त्यात आम्ही केलेली चर्चा  , त्याच विषयाशी संबंधीत अश्या एका वेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांच्या गटाने केलेल्या वाचन , संशोधनाचे सादरीकरण ह्याचा गोषवारा इथे मांडवा असं मला वाटतंय . जशी lectures होतील तसं त्याच लिहिण्याचा प्रयत्न करेन . बघूया कितपत जमतंय . खरतर इंग्रजीत झालेल्या चर्चा मराठीत आणि  माझ्या भाषेत मांडणं हेच बहुतेक सगळ्यात कठीण असेल . English मध्ये लिहिणं खरंच खूप सोपं गेलं  असतं पण अश्या प्रकारचे विषय एकत्रित मराठीत कुठे मांडले गेलेले माझ्या सहज वाचनात आले नाहीत म्हणूनच ही उठाठेव !

===================================================
मानवशास्त्र म्हणजेच Humanities चा कोर्स आम्हाला प्रत्येक सत्रात असतो त्यातला शेवटचा केवळ एका क्रेडिटचा सेमिनार कोर्स म्हणजेच UH 302 : Introduction to governance म्हणजेच ' शासनाची ओळख ' !
अगदी नावाप्रमाणेच ह्या कोर्सच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या शासनयंत्रणांची ओळख - माहिती आणि त्यासोबत त्या यंत्रणेशी संबधित एखाद्या संवेदनशील / महत्वपूर्ण विषयावर विद्यार्थी गटाने केलेले प्रेझेंटेशन असे एका सत्राचे स्वरूप असेल . आत्तापर्यंत २ सत्र झाली आणि मुख्य म्हणजे जेवणाची वेळ उलटून गेली तरी -  रात्रीचे साडे आठ वाजून गेले तरी आणि मुख्य म्हणजे जवळपास तीन तास चर्चा - परिसंवाद होऊनही ५० % उपस्थिती शेवटपर्यंत होती  हे नक्कीच आश्चर्यकारक ( प्राध्यापकांसाठी :P ) होतं . 




प्रध्यापाकांबद्दल थोडेसे :
Prof . Uday Balakrishnan हे १९७५ च्या batch चे भारतीय टपाल सेवेतील एक निवृत्त अधिकारी ! राज्यशास्त्रात उच्चशिक्षण घेतलेल्या उदय यांनी भारत सरकारच्या अनेकविध महत्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे आणि त्या अनुषंगाने देशाचा बराचसा ग्रामीण भागही पिंजून काढला आहे . ह्या सेवेच्याच कालावधीत शासनातर्फे त्यांची नेमणूक IISc मध्ये ५ - ७ वर्षे registrar म्हणून झाली होती . सध्या  ते एक लेखक , CCS -  IISc मध्ये मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत असून कोचीन येथील एका कला संग्रहालयाचे सल्लागार देखील आहेत .


===================================================


Lecture ०१ : १० जानेवारी २०१५

खरंतर त्या दिवशी मुख्यत्वे आमचे गट पाडणं , विषय निवडणं आणि लेक्चरच्या वेळा ठरवणं ह्यातच बराचसा वेळ गेला परंतु नेमकं काय काय शिकायला मिळेल ह्याची थोडीफार चर्चाही झाली.

भारत  : एक लोकशाही संघराज्य 
वय : जेमतेम ७० वर्षे
लोकसंख्या केवळ अफाट !
अनेक तापदायक शेजारी !
मुक्त अर्थव्यवस्था : १९९१ पासून प्रयत्न


कृषिप्रधान अर्थव्यवस्था
आणि  ……
आपण अजून स्वतंत्र  आहोत  - लोकशाही कशी असावी एक उत्तम उदाहरण . आज आपल्याला ( अजूनतरी ) कोणीतरी लष्करी अधिकारी अचानक उठाव करून देश ताब्यात घेईल ह्याची तितकीशी भीती नाही खरंतर  असा विचार आपण कधीच करत नाही !
 कितीही संकटे आली तरीही एक देश म्हणून आपण एकत्र येतो . खरंतर वाकेन पण मोडू देणार नाही अश्या लवचिक मानसिकतेतून आजवर आलेल्या अनेक अंतर्गत राजकीय - सामाजिक - नैसर्गिक उठावांना आपण यशस्वीपणे तोंड दिले.
इंग्रजांनी जिथे सोडले तिथूनच आपण प्रगतीला सुरुवात केली ! आज आपण त्या प्रगतीच्या - उत्कर्ष साधण्याच्या मार्गावर असलेल्या एका वळणावर उभे आहोत . कदाचित पुढच्या विकासासाठी आपल्याला आजची परिस्थिती बदलायची नितांत गरज असेलही पण हा केवळ एक टप्पा आहे आणि १९४७ च्या मानाने आणि तत्कालीन आर्थिक परिस्थिती , लगोलग झालेली युद्धे  , आणीबाणी ह्या सर्वांना तोंड देऊन आपण एक देश म्हणून जी प्रगती साधली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे !

आगदी जुने* संदर्भ चाळले तर अनेक अमेरिकन आणि युरोपीय राजकीय अभ्यासकांनी दक्षिण आशियाला वाचवायचा असेल तेथील परिस्थिती सुधारावयाची असेल तर भारताचा बळी  लागेल अशी अभ्यासपूर्ण विधाने केली होती त्यापार्श्वभूमीवर आपण एक लोकशाही सार्वभौम संघराज्य म्हणून ( अलिप्ततावाद सांभाळून ) जे काही साधले आहे ते तितकेही वाईट नाहीच म्हणून ह्यापुढे वेगवेगळे विषय चर्चेस घेऊन त्यासंदर्भात आजवर काय झाले आणि कोणत्या सुधारणा करता येतील / पुढची विकासाची दिशा काय आहे हे समजून घेऊया .





*१९५० पूर्वी आणि त्यासुमारास काहीवेळा १९६५ नंतरही 

बुधवार, १० डिसेंबर, २०१४



बरेच दिवस झाले , नवीन काही लिहिले गेले नाही माझ्याकडून .
अनेक मसुदे अर्धवट राहिले आहेत . अभ्यास , मराठीत टाईप करण्यासाठी लागणारा वेळ , त्यासाठी चांगल्या गतीचे इंटरनेट …

कारणे नेहेमीप्रमाणेच अनेक …

आता आलास झटकून काहीतरी लिहिलेच पाहिजे

रामदासांनी म्हटले आहेच :

दिसामाजी काहीतरी ते लिहावे
प्रसंगी अखंडित वाचीत जावे
अभ्यासे प्रकट व्हावे
नाही तरी झाकोनी असावे
नेमकचि बोलावे
तत्काळची प्रतिवचन द्यावे

- Sam

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

दीपावली : एक मुक्त चिंतन

शुभ दीपावली आणि नववर्षाच्या शुभेच्छा !

असाच थोडा विचार करत बसले होते अन् विचारांची मुक्त उधळण सुरु झाली मनात . थोडीशी विस्कळीत थोडीशी आठवणीनी ओथंबलेली . आणि मग उतरवली अनुदिनीवरल्या ह्या कागदावर … 

दिवाळी दिवाळी म्हणजे नेमकं काय ?

सध्यापुरता विचार केला तर गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून माझ्यासाठी हा एक सुटी असलेला दिवस ह्याशिवाय तरी काही वेगळे महत्व नाही या दिवसाचं !

आजोबा असताना मी शाळेत असल्यामुळे मोठी सुटी मिळे आणि पूर्ण दोन आठवडे ठाण्याला जाऊन राहता येई .आजी आणि दोन्ही दादांबरोबर रांगोळी काढणे,  किल्ले बघायला जाणे अन भर दुपारी उन्हात मनसोक्त खेळणे असे ते सुंदर दिवस होते . याहीपेक्षा आजोबांसोबत दिवाळीच्या सुटीतला अभ्यास करायला मिळायचा. खूप मजा यायची या सुटीच्या दिवसांत . कितीतरी नवीन पद्धती , गणितातील गमती - जमती , लिखाणाचा सराव , मुद्रितशोधानात त्यांना केलेली मदत अन् दिवाळीच्या वहीसाठी लढवलेली कल्पकता हीच खरी  दिवाळी असायची माझ्यासाठी.केवढा शिकायला मिळलय तेव्हा आजोबांकडून ! दिवाळीची वही सजवताना , अगदी एक साधा कागद वहीत कमीत कमी गोंद वापरून कसा नीट चिकटवायचा इथपासून ते अगदी डोळ्यासमोर उभे राहील असे प्रवासवर्णन सोप्या शब्दात कसे लिहायचे किवा पत्र कसे लिहायचे हे सारे नकळत शिकायला मिळाले आजोबांकडून ह्या जेमतेम ५-६ दिवाळीच्या सुट्यांमध्ये . अशाच बहुदा त्यांच्या शेवटच्या दिवाळीत आयडियलकडे मागवून घेतलेली अन मला काही पूर्वकल्पना न देता माधुरी पुरंदरे ह्यांची "वाचू आनंदे " हे पुस्तकांची मालिका  वाढदिवस आणि दिवाळी भेट म्हणून त्यांनी घेतली होती . ती आजवरची मला मिळालेली सगळ्यात मौल्यवान अन खूप काही शिकवुन गेलेली अशी विशेष दिवाळी भेट ठरली. 
नावापुरते आणि आमची हौस भागवायला २-४ अनार ,  एखादे भुईचक्र आणि फुलबाज्यांचा एक खोका हे आणि एव्हढेच फटाके घाबरत घाबरत आई - बाबा , आजी - आजोबा,  मावशी - काका आणि दोन्ही दादांसोबत अंगणात फोडायचो . कसं कोण जाणे पण फटक्यांमुळे प्रदूषण होते इ  गोष्टी मला त्या लहान वयातही समजत होत्या . केपा आणि त्यांच्या बंदुका घेऊन मात्र आम्ही बरेच दिवस वेगवेगळे चोर शिपाई आणि इतर मारामारीचे खेळ वाडाभर उंडारत खेळत असू . आजोबा गेले अन् त्यावर्षी फटाके आणण्याचे थांबवले ते थांबवलेच . नंतरही कधीतरी आईने एकदोन फुलबाज्या आणल्या होत्या ; पण ती मजा नसल्यामुळे इच्छाच झाली नाही फटके फोडायची . पणत्या आणून त्या रंगवणे हाही एक उपक्रम मात्र नंतर बरेच वर्ष मी केल्याचं मला चांगलंच आठवतंय . 

आजोबा गेल्यावरही आजीसोबत ह्यातल्या बऱ्याच गोष्टी दर दिवाळीच्या सुटीत होत असत पण ती मजा पुन्हा कधीच आली नाही . नंतर नंतर अभ्यास वाढत गेला अन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यात ही सुटी संपू लागली पण त्यात एक वेगळी मजा  होती ज्ञान मिळवण्याची अन यश संपादन करण्याची .
पण ह्या साऱ्यात एक अत्यंत समान धागा होता ज्यात माझा बराचसा वेळ व्यतीत होई  तो म्हणजे "दिवाळी अंक " किमान दहा अंकांचे वाचन झाल्याशिवाय समाधानच होत नसे. मग ते अगदी चंपक किशोर पासून ते मोठ्यांच्या मासिकातील त्या वयात वाचण्याजोग्या कथा अन मुलाखती असोत . पुढे पुढे गाडी चांदोबा वगैरेंवरून एकदम पत्रिका , छात्र प्रबोधन यांवर येउन थांबली. पण ह्या अंकांनी जणू व्यक्तिमत्व घडणीत फार मोठा मोलाचा वाटा  उचलला . समाज म्हणजे काय ह्याचे भान हळूहळू ह्यातून येत गेले. माणसांच्या चित्रविचित्र स्वभावाचे निदान theoretically ज्ञान होत गेले .दिवाळी अंकांची चाहूल मला पार कोजागिरी पासून लागत असे. कोणताही अंक माझ्याशिवाय कोणी उघडायचा नाही ह्या एका कारणावरूनच काय तो हट्ट - चिडचिड आणि रडणं होत असे. दिवाळी म्हणजे दिवाळी अंक हे जवळ जवळ bijective Function जणू ! 

हळू हळू मोठी होत गेले तसा आता वर्षभर खात असलेल्या चिवडा - लाडू चकलीचे दिवाळीपुरते पूर्वी असलेले महत्व कमी झाल्याने, घरातल्या अनेक मधुमेहींमुळे एकूणच गोड मिठाई आणि इतर पदार्थ खाण्यातला कमी झालेला उत्साह , वर्षानुवर्षे पाहिलेली दादरची खरेदीची गर्दी आणि आधीच गरज भागेल इतके असलेले कपडे ह्यांमुळे नवीन कपडे वगरे बद्दल असलेली अनास्था , कुटुंबीयांनी एकत्रित भेटण्यासाठी नसलेला वेळ आणि मुंबईत होणाऱ्या प्रचंड प्रदूषणामुळे होणारी चिडचिड … एकूणच ह्या अनेक घटकांमुळेच दीपावली साजरी करण्यात फोलपणा आहे असेच काहीसे वाटू लागले . घरी तसेही कोणत्याच सणाचे प्रस्थ - पूजा - अर्चांचे अवडंबर नव्हतेच . कदाचित त्यामुळेच मी मनातून ह्या  दिखाऊ साजऱ्या उत्सवापासून कायमच दूर दूर जात राहिले .

गेली तीन वर्षे मात्र इथे वेगळ्याच विश्वात असल्याने दिवाळीचातसा विशेष गंधही नाहीये. नवीन कपडे घालणे अन केवळ आपली संस्कृती , पूजा - अर्चा … अशा दृष्टीकोनातून मी कोणत्याच सणाकडे अन विशेषत: दिवाळीकडे आजतागायत पहिले नसल्यामुळेच  असेल कदाचित पण राहिलेला अभ्यास संपवण्यासाठी मिळालेली एक बोनस सुटी अशी माझी मानसिकता झालीये . फारतर आंतरजालावर प्रसिद्ध होणारऱ्या दिवाळी अंकाचे वाचन एवढाच माझा काय तो दिवाळीशी संबंध . 
आम्ही सगळीच भावंडं वेगवेगळ्या शहरांत आणि आपापल्या कामात व्यग्र आहोत . आणि . . आता आजीही नाही :( आम्हाला सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवणारा हा महत्वाचा दुवाच निखळलाय. यंदापासून तिची दरवर्षी होणारी भाऊबीजही आता ह्यापुढे नसेल . माझी दृष्ट काढायला ते सुरकुतलेले मऊ हात नसतील अन् मुख्य म्हणजे मी पुढच्या सुटीत घरी जाईपर्यंत माझ्यासाठी खुणा करून ठेवलेल्या दिवाळी अंकातले लेख नसतील . छात्र प्रबोधनच्या अंकाला कुणीच स्पर्श केलेला नसेल . आई - बाबा देखील बहुदा कार्यालयातून मिळालेली ही सुटी इतर कामे करण्यासाठीच वापरत असतील.

खरंतर सगळी मजाच जणू निघून गेलीये आता दिवाळीतली. इथे सगळ्या मैत्रिणी sweets , new dresses , पूजा , lamps अश्या चर्चा करत असताना त्यात सहभागी व्हायची अजिबात इच्छा नाहीये . त्यात एकाच समाधान म्हणजे आज एक नवीन दिवाळी अंक वाचायला मिळाला . अक्षरश : झपाट्याने वाचून काढला अन् वाटले हीच माझी यंदाची दीपावली . 


गेले ते दिन गेले म्हणत त्या जुन्या आठवणीत रमायचे अन् पुढील अभ्यासासाठी सज्ज व्हायचे यासाठी घेतलेला एक थांबाच जणू …

- Sam

ऑक्टोबर २३ , २०१४
लक्ष्मीपूजन

रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

पूर्णविराम : एका वेगळ्या प्रवासाला

१४ सप्टेंबर २०१३
अचानक संध्याकाळी एक धक्का बसला . एक जबाबदारी अंगावर पडली !  हे सगळा इतकं अनपेक्षित होतं की तेव्हा कसलाच विचार केला नव्हता . डोक्यात विचारचक्रे सुरु झाली होती पण ; पुढे काय होणार आहे हे तेव्हा कळणार तरी कसे होते ! त्या वेळी  आधीच इतक्या गोष्टीत मी गुंतलेले होते की एक चेंलेंज स्वीकारावं तसा काहीसं डोक्यात नोंदले गेले ते क्षण ! 



१४ सप्टेंबर २०१४
 खरंतर ज्या क्षणी मी हे उतरवत आहे त्याच सुमारास हे घडलं . आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालंय .

सुरुवातीला वाटणारी नसती कटकट नंतर खरंच आनंद देऊन गेली . कधी चेंलेंज म्हणून तर कधी मजा म्हणून जे जे जमेल ते करत गेले .
सगळ्यांपेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असूनसुद्धा माझ्यावर कोणीतरी विश्वास टाकला होता माझ्यापरीने मी तो सार्थ ठरवलाय. भल्यासाठी  जितकं जमेल तितकं केलंय . चुका माफ नक्कीच होतील

अनेकांना सोबत घेऊन काहीतरी यशस्वी करणं हे सोपं नसतं  विशेषत : मुलींना , ह्याची जाणीव ह्या प्रवासात झाली .
अनेक हात सोबतीला  पण तोंडं चार दिशांना अश्या परिस्थितीत खंबीरपणे मार्ग कसा काढायचा हेही ह्यानिमित्ताने उमगलं. प्रवाहाविरुद्ध पोहताना अनेक अडचणी असल्या तरीही त्यात एक वेगळी मजाही असते हे समजलंय .
कधी चुकले , कुठे अडखळले. कधी एकटीनेच मार्ग काढला तर कधी कोणाच्या सोबतीने . मार्गदर्शन करायला अनेकांची साथ अन् भरभक्कम पाठींबा वेळोवेळी होताच . त्याशिवाय हे निभावणं शक्यही झालं नसतं .

 एका जबाबदारीतून मुक्त झाले . दिवस - रात्र एक करून , जेवण विसरून करावे लागणारे कामही नसेल . उरल्यात त्या फक्त गेल्या वर्षभरातल्या  कडू - गोड आठवणी . निरोपाचे दु:ख निश्चितच नाही . पण जोडला  गेलेला  मित्रपरिवार  दुरावेल ह्याचे वाईट नक्कीच वाटतंय .

अशी हि अनुभवांची शिदोरी घेऊन आता पुढे वाटचाल करणार आहे .

अगदी मुक्तपणे .. . .

- संपदा



रविवार, १० ऑगस्ट, २०१४

३ राख्यांची गंमत

आज रक्षाबंधन !
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत नियमितपणे साजरा केला जाणारा एक सण !

आषाढीनंतर शाळेला असणारी बहुदा पहिलीच सुटी ,खरंतर या सणापासून जे सुट्यांचे सत्र सुरु होई ते बहुदा दिवाळीनंतरच संपत असे म्हणून खासच अप्रूप होते मला ह्या सणाचे !
केवळ बहिणीनेच भावाला राखी बांधायची हे काही मला कधीच पटले नाही. माझ्या आवडीच्या राख्या घ्यायच्या / तयार करायच्या आणि त्या बांधणार मात्र माझे दोन बंधुराज ही संकल्पनाच मला सहन होत नसे अन् म्हणूनच मी नेहेमीच ३ राख्या घेत असे . दोन दादांना बांधत असे अन शेवटची एक त्यांच्याकडून बांधून घेई ! अगदी दुसऱ्या दिवशी  शाळेत जाताना देखील बऱ्याचदा मी ती राखी काढत नसे .
गेली काही वर्षे आम्ही तिघे तीन वेगवेगळ्या शहरात राहत आहोत त्यामुळे प्रत्यक्ष रक्षाबंधन काही होत नाही . केवळ मेलद्वारे राखीची इमेज पाठवली आज अन मग अचानक तीन राख्यांची गंमत आठवली आणि मेल पाठवताना स्वत:लाच CC करायला हवा होता का असा विचार करत बसले  :D



- Sam

( राखी आंतरजालावरून साभार )

सोमवार, ७ जुलै, २०१४

काही क्षण . . . १ ( Wimbledon Final 2014 )

काल बऱ्याच वर्षांनी अशी ठाण मांडून वगैरे टेनिसची match बघितली . अप्रतिम झाली . फेडरर हरला ह्याचे दु:ख आहेच परंतु तो काही वर्षांपूर्वी बहरत असताना जसा खेळायचा तसाच अगदी पुन्हा बघायला मिळाला .

गंमत म्हणजे बाबांसोबत laptop समोर ६.३० पासून ते रात्री १०. ३० पर्यंत असं पसरून बसलेलं असताना आईने एकदाही हटकलं नाही किंवा माझ्या आरोळ्या आणि आरडा-ओरडा ऐकून रागावली नाही त्यामुळे तर ह्या सगळ्याची मजा अजूनच वाढली  : ) 

अप्रतिम सर्विसेस ,सर्व - वॉली , विचार करून केलेले अप्रतिम प्लेसिंग्स , पासिंग शॉट्स , रंगलेल्या rallies , फेडीने वाचवलेले match points , सामना ४ थ्या सेटमध्ये न गमावता शेवटपर्यंत दिलेली झुंज !! अहाहा !
असे सामने इतक्या सहजी बघायला मिळत नाहीत .

फेडरर हरला त्याचे खूप वाईट वाटले पण ज्या जिद्दीने त्याने पुढच्या वर्षी इथे येईन हे म्हटले ते पाहून वाटले हा मनुष्य wimbledon जिंकल्याशिवाय काही निवृत्ती घेत नाही ! सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे हा रडूबाई काल रडला नाही, कदाचित सध्या तो जिंकण्या हरण्यापेक्षाही आनंदासाठी खेळतोय हेच त्याला दाखवून द्यायचे असेल . तो हरला हे पाहून मलाच खरतर प्रचंड वाईट वाटलं होतं तिथे त्या बिचार्याचे काय झाले असेल ! Better luck next time dear Federer !

( इंटरनेटवरून साभार )

सहसा घरी असताना रविवारी संध्याकाळी सी- फेसला जाणं मी कधीच चुकवत नाही पण काल मी गेले नाही ह्याचं अजिबात दु:ख नाही याउलट अप्रतिम सामना बाबांसोबत running commentary ( खरंतर चीत्कारणे )  करत पाहताना खूप मज्जा आली .

Thanks Federer and Djokovick for the great match !