मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

आधुनिक भारतीय गणित देवता

१९५८ चा तो काळ ! दुसऱ्या महायुद्धाच्या जखमा घेऊनच जपान इतर क्षेत्रांप्रमाणेच विज्ञानातही पुन्हा भरारी घेण्याचा प्रयत्न करत होता. अमेरिकेनेही त्या काळात जपानमध्ये काही पुनर्वसन उपक्रम राबवले होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रा. अन्द्रे वेइल सारखे काही विख्यात अमेरिकन गणितज्ञ जपानच्या दौऱ्यावर गेले होते. ह्या दौऱ्यात काही तरुण हुशार जपानी गणिताच्या विद्यार्थ्यांना ह्या गानिताज्ञांसोबत चर्चा करायची संधी मिळाली.मुलाचं गणितातलं ज्ञान पाहून आंद्रेईनी त्यातल्या १०-१५ मुलांना सोबत अमेरिकेत येण्याचं आमंत्रण दिलं. आणि अश्या प्रकारे जपानी अमेरिकन गणितज्ञांची पहिली पिढी अमेरिकेत स्थिरावली.
प्रा. केन ओनो हे दुसऱ्या पिढीतले जपानी- अमेरिकन गणितज्ञ म्हणजेच प्रा. ताकाशी ओनो ह्या गणितज्ञांचे चिरंजीव.
तो काळही अमेरिकेतल्या जपानी मंडळींसाठी विशेषत: केनसारख्या तरुणांसाठी संघर्षाचा होता. पर्ल हार्बर अनेक अमेरिकन्स विसरलेले नव्हते. घरात जपानी शिस्तीचे कडक वातावरण आणि बाहेरच्या अमेरिकन संस्कृतीचे आकर्षण. केनने १६व्या वर्षी शिक्षण सोडून देऊन वडिलांविरोधात बंड पुकारले. त्याच सुमारास एक केनसाठी एक अनपेक्षित घटना घडली. एका सकाळी एस. जानकी अम्मल ह्या बाईंचे पत्र ताकाशी ओनोंसाठी आले. ते पत्र पाहताच प्रा. ताकाशींनी मनोभावे नमस्कार केला अन् अत्यंत भावपूर्ण होऊन केनला एक गोष्ट सांगितली. आणि ती होती प्रख्यात भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन ह्यांची !
आणि ते पत्र होते रामानुजन ह्यांच्या पत्नीचे !
१९८५ मध्ये जगभरातील ( मुख्यत्वे अमेरिका आणि UK ) गणितज्ञांनी रामानुजन ह्यांचा ब्राँझचा अर्धपुतळा तयार करण्यासाठी पुढाकार घेऊन वर्गणी गोळा केली होती त्यासाठी आभार मानणारे पत्र होते ते.
केनच्या वडिलांना, पहिल्या महायुद्धाच्या प्रतिकूल काळात रामानुजननी इंग्लंडमध्ये राहून संशोधन चालू ठेवण्यासाठी दिलेला लढा हा अमेरिकेत टिकून राहण्यासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला होता.
आणि त्याक्षणापासून केनला रामानुजन उलगडत गेले, समजत गेले आणि आज केन त्यांना देव मानतो !
इतकंच नव्हे तर स्वत:च्या गणितातल्या संशोधनाव्यतिरिक्त केननी मद्रास विद्यापीठात जाऊन स्वत: रामानुजनच्या वह्या अभ्यासल्या. त्यांच्या केम्ब्रिजमधल्या कामाची हस्तलिखिते, कागदपत्रे अभ्यासली आणि नुकतंच त्याच्या विद्यार्थिनीने आजपर्यंत दुर्लक्षिला गेलेला एक रामानुजन ह्यांचा सिद्धांत त्या कागदपत्रांमधून शोधून काढला !
---------------------------------------------------------------------------------
श्रीनिवास रामानुजन ऐयंगार, आधुनिक युगातले प्रख्यात भारतीय गणितज्ञ ! ( the most celebrated indian mathematician of २०th century )
आज २२ डिसेंबर ही त्यांची जयंती. हा दिवस २०१२ पासून भारतात ' राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून साजरा केला जातो.
Srini ramanujan_0.jpg
---------------------------------------------------------------------------------
रामानुजन ह्यांच्या गणितकार्याविषयी मी विशेष लिहिणार नाही कारण विकिपीडियावर बर्यापैकी सोप्या भाषेत लिहिलेलं आहेच आणि चर्चेच्या अनुषंगाने येइलच.
रामानुजन ह्यांनी केलेल्या संशोधनाला पुढे नेउन अनेक नवीन वाटा गणितात निर्माण झाल्या. अनेक शास्त्रज्ञांना अत्यंत प्रतिष्ठेची ' फिल्ड्स' पदकं मिळाली. आजही रामानुजन ह्यांचं कार्य एक मैलाचा दगड मानलं जातं.
---------------------------------------------------------------------------------
Robert Kanigel ह्यांनी The Man Who Knew Infinity हे श्रीनिवास रामानुजन ह्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक लिहिलं. आता ह्याच पुस्तकावर आधारित Matthew Brown दिग्दर्शित चित्रपट येतो आहे. ह्या चित्रपटातला गणिताचा भाग प्रा. केन ओनो आणि प्रा. मंजुळ भार्गव ह्यांनी लिहिला आहे त्याशिवाय इतरही बरीच मदत केली आहे. त्यामुळेच हे दोन सध्याचे आघाडीचे गणितज्ञ ह्या हॉलीवूडपटाचे को- प्रोडुसर झाले आहेत !
चित्रपट : The Man Who Knew Infinity
------------------------------------------------------------------------------
नुकतंच प्रा. केनचं रामानुजन ह्यांच्या आयुष्यावर, गणितसंशोधनावर ICTS मध्ये व्याख्यान झालं त्यात ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळाला आणि म्हणूनच त्याचा सारांश, गणिताचा भाग वगळून इथे द्यायचा प्रयत्न केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा